घरमुंबईग्राजिया होंडा गाडीच्या टेल लाईटवरून गुन्ह्याचा छडा !

ग्राजिया होंडा गाडीच्या टेल लाईटवरून गुन्ह्याचा छडा !

Subscribe

ठोकळा - ठाणे जळीतकांड

ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात नऊ बाईकला लावलेल्या आगीचा छडा अवघ्या २४ तासाच्या आत लावण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. विजय जोशी (वय २२) आणि अनिकेत जाधव (वय १९) रा. गणेशवाडी, या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. पूर्ववैमनस्यातूनच हा प्रकार केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. ग्राजिया होंडा गाडीच्या टेल लाईटच्या प्रकाशावरूनच पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे, अशी माहिती ठाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ- १ चे उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.

६ डिसेंबला मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास ठाण्यातील गणेशवाडी परिसरातील कॅडबरी ते नितीन कंपनी या सर्व्हिस रस्त्यावर पार्क केलेल्या ९ बाईकला आग लावून पेटवून देण्यात आल्या होत्या. यामध्ये ५ होंडा अ‍ॅक्टिव्हा, १ होंडा सीबी युनिकॉर्न, १ टीव्हीएस वेगो, १ यामाहा एफ झेड – ५ आणि १ सुझुकी गिक्सेर अशा ९ बाइकचा समावेश होता. यामुळे सुमारे ३ लाख ५८ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाल्याची तक्रार अमित खापरे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र एकाचवेळी ९ गाड्या पेटवल्याने खळबळ उडाली होती.

- Advertisement -

पोलिसांनी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणची सुमारे ४० ते ५० सीसी कॅमेर्‍यांची विविध अँगलने तपासणी केली. आरोपी कोणत्या गाडीने आले असावे याची तपासणी केली. रस्त्यावर टेल लाईटचा एल टाईपचा प्रकाश पडलेला दिसत होता. त्यामुळे टेल लाईटच्या या प्रकाशावरून ती गाडी कोणत्या प्रकारची असावी याची आजूबाजूच्या गॅरेजमधून व शोरूमधून पोलिसांनी माहिती मिळवली. त्यावेळी ती ग्राजिया होंडा बाईक असल्याचे निष्पन्न झाले. ग्राजिया होडा गाडीचा शोध घेतल्यानंतर ती जळालेल्या गाडीच्या शेजारील फुटपाथवर आढळून आली. ती गाडी आरोपी अनिकेत जाधवची निघाली. विजय जोशी आणि अनिकेत हे दोघे या गाडीने रात्री येऊरहून आले होते.

अनिकेतच्या गाडीतूनच त्याने पेट्रोल काढून एक गाडी पेटवली, पण आगीचा भडका उडाल्याने इतरही गाड्या जळाल्या. आपल्या गाडीला काहीही होऊ नये यासाठी त्यांनी त्यांची गाडी फुटपाथवर पार्क केली होती. पण आगीचा भडका उडाल्याने त्याची झळ त्या गाडीलाही लागली. अनिकेतला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी विजयला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका मिळताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, असे उपायुक्त स्वामी यांनी सांगितले.

- Advertisement -
ते चोर- चोर म्हणून हिनवायचे 

आरोपी विजय जोशी हा गणेशवाडी परिसरात राहत असून तो कोणताही कामधंदा करीत नाही. त्याच परिसरातील एका व्यक्तीशी त्याचा वाद झाला होता. काही महिन्यांपूर्वी विजयवर चोरीचा आळ घेण्यात आला होता. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या कारणावरून आजूबाजूची मुले त्याला चोर चोर म्हणून हिनवायचे. त्याचा राग मनात ठेवून वाद झालेल्या व्यक्तीचा काटा काढू, असा विचार तो करू लागला. वाद झालेल्या व्यक्तीनेे नवीन गाडी घेतल्याची माहिती विजयला मिळाली होती. त्यामुळे त्याची नवीन गाडी पेटवून देवू, असा प्लॅन त्याने आखला. येऊरला पार्टी केल्यानंतर मध्यरात्री तीनच्या सुमारास अनिकेतच्या गाडीने तो तेथे आला. त्याच्याच गाडीतील पेट्रोल काढून त्याने तेथे उभी असलेली नवीन गाडी पेटवून दिली. पण आगीचा भडका उडाल्याने इतर गाड्यांनीही पेट घेतला. मात्र विजयने ज्या व्यक्तीची नवीन गाडी समजून पेटवली ती गाडी दुसर्‍याची निघाली. एक गाडी पेटवत असतानाच नऊ गाड्यांनी पेट घेतला. अखेर दोघेही पोलिसांच्या कोठडीत अडकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -