सायन रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदल: २ कर्मचारी निलंबित,

sian hospital kidney racket
सायन रुग्णालयातील संतापजनक प्रकार

मुंबई महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याप्रकरणी शवागारातील २ कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अशा चुकांचे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करीत नसून या दुर्दैवी प्रकारात दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करताना मूत्रपिंड (किडनी) काढण्यात आल्याचा आरोप सर्वस्वी चुकीचा असल्याचे स्पष्ट करत हे आरोप प्रशासनाने फेटाळले आहे.

शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अंकुश सुरवडे (वय २६) यांना २८ ऑगस्ट २०२० रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. एका अपघातात जबर जखमी झाल्याने उपचारार्थ आलेल्या अंकुश सुरवडे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना जीवरक्षक प्रणालीसह उपचार पुरवण्यात येत होते. दुर्दैवाने अंकुश यांचे रविवारी सकाळी निधन झाले. विहित प्रक्रियेनुसार त्यांचे शव उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले.

दरम्यान, सायन रुग्णालयातच हेमंत दिगंबर यांना शनिवारी मृतावस्थेतच त्यांच्या नातेवाईकांनी आणले होते. अंकुश व हेमंत या दोन्ही रुग्णांच्या शवांची उत्तरीय तपासणी रविवारी सकाळी करण्यात आली. त्यानंतर दोन्ही रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते. अंकुश सुरवडे यांच्या नातेवाईकांनी रविवारी सकाळीच रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून कळवले की, दुपारी ४ वाजेच्या सुमारास येऊन ते अंकुश यांचा शव ताब्यात घेतील.

दरम्यानच्या कालावधीत, हेमंत यांचे नातेवाईक रुग्णालयात आले. त्यांनी अंकुश यांचा मृतदेह हा हेमंत यांचा असल्याचे ओळखून, सर्व प्रक्रिया पार पाडून, पोलिसांच्या स्वाक्षरीनंतर नेला. प्रत्यक्षात अंकुश यांचे शव हे हेमंत यांचे शव असल्याचे समजून सोपवण्यात आले. हेमंत यांच्या नातेवाईकांनी शव ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्काराचे विधीदेखील पार पाडले.

त्यानंतर, अंकुश यांचे नातेवाईक रुग्णालयात आले व त्यांनी शव ताब्यात देण्याची विनंती केल्यानंतर ही चूक घडल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे अंकुश यांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. पोलीस प्रशासनही रुग्णालयात आले. घडल्या चुकीमुळे एकंदर परिस्थिती हाताबाहेर जावू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले.

शव अदलाबदल होण्याचा प्रकार हा दुर्दैवी असून त्याचे कोणत्याही प्रकारे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करत नाही. घडलेल्या चुकीबाबत प्रशासन दिलगीर आहे. या घटनेतील चुकीबद्दल, शवागारातील संबंधित दोन कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीअंती दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. तथापि, शवविच्छेदन करताना मयतांचे मूत्रपिंड (किडनी) काढण्यात आल्याचा आरोप मात्र अयोग्य असून हा आरोप नाकारत असल्याचे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.