घरमुंबईपुढच्या वर्षी लवकर या...

पुढच्या वर्षी लवकर या…

Subscribe

गणरायाला जड अंत:करणाने निरोप

पुढच्या वर्षी लवकर या… गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत गुरुवारी जड अंत: करणाने भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. सकाळपासूनच शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. त्यात पावसाने अधूनमधून विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. परंतु भाविकांनी पावसाकडे दुर्लक्ष करत आपल्या गणरायाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन केले.

आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अनेक भाविकांनी सकाळपासूनच गिरगाव, दादर व जुहू चौपाटीवर प्रचंड गर्दी केली होती. तर अनेक भाविकांनी आपल्या परिसरातील तलाव, कृत्रिम तलावावर गर्दी केली होती. लालबागचा राजा, गणेशगल्लीचा मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकायाचा गणपती, गिरगावचा राजा असे मोठमोठे गणपती तसेच मुंबईतील बहुतेक गणपती हे विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आणण्यात येत असल्यामुळे या चौपाटीकडे जाणारे सर्व रस्ते गणेशभक्तांनी ओसंडून वाहत होते. यामध्ये लहानथोरांपासून आबाळवृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश होता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करत चौपाटीवर येणार्‍या प्रत्येक गणरायाला भाविकांकडून निरोप दिला जात होता. गिरगाव, दादर व जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणात येणार्‍या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांनी त्यांच्या अल्पोहारासोबत पाण्याची व्यवस्था केली होती. ठिकठिकाणी वडापाव, समोसा, पाणी, सरबत, बिस्किटे याचे वाटप करण्यात येत होते.

- Advertisement -

सकाळपासून सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत पावसाने अधूनमधून विघ्न आणण्याचे अनेकदा प्रयत्न केले. मात्र त्यामुळे भाविकांचा उत्साह अधिकच ओसंडून वाहत होता. दुपारच्या सुमारास पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वातावरणातील उष्मा कमी होऊन भाविकांना दिलासा मिळाला मात्र सायंकाळी सहाच्या सुमारास लावलेल्या पावसामुळे मात्र भाविक गारठले. विसर्जनात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलिसांनी रस्त्यांवर ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घेतलेली होती. विसर्जनाला येणार्‍या भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक विभागाने पुरेपूर खबरदारी घेतली होती.

स्वयंसेवी संघटनाची मदत
मुंबईसह ठाण्यात विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात अनेक स्वयंसेवी संघटनांनी गणेशभक्तांसाठी विविध प्रकारचे स्टॉल्स बांधत मदतीचा हात पुढे केला होता. काहींनी पिण्याचे पाणी, काहींनी वडापाव तर काहींनी चहा चे वाटप करीत गणेशभक्तांना दिलासा दिला. तर वांद्रे येथे अखिल चित्रे यांच्याकडून तर थेट पिझ्झा आणि बर्गरसारख्या फास्ट फूडचे वाटप करीत गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेण्यात आले.

- Advertisement -

पुढच्या वर्षी बाप्पाचे आगमन लवकर
पुढच्या वर्षी बाप्पाला लवकर येण्याचे आवाहन भाविकांनी करत त्याला निरोप दिला असला तरी पुढील वर्षी बाप्पा तब्बल 11 दिवस लवकर येणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. पुढच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी २२ ऑगस्टला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -