घरमुंबईगणपती बाप्पा मोरया....

गणपती बाप्पा मोरया….

Subscribe

आठवडाभरावर आलेल्या गणरायाच्या आगमनासाठी मुंबईतील विविध बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. दहीहंडीच्या उत्सवानंतर नागरिकांच्या हातात फार कमी वेळ असल्याने खरेदीकडे सध्या मोठ्या प्रमाणात कल आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची व घरगुती गणपतीच्या आगमनाच्या सुरू असलेल्या तयारीचा ‘आपलं महानगर’ने घेतलेला आढावा…

पुरग्रस्ताच्या मदतीसाठी गणेशोत्सव मंडळांचा निर्धार
कोल्हापूर, सांगलीतील महापुरामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्स मंडळाला मदतीसाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील अनेक मंडळांनी अतिरिक्त खर्च टाळून पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत 10 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, त्यातील 2 हजार 400 गणेशोत्सव मंडळे मोठी आहेत. कोणताही थाटमाट न करता वर्गणी व दानपेटीतून जमा होणार्‍या रक्कमेतून पुरग्रस्तांना गरजेच्या वस्तू पुरवल्या जाणार आहेत, असे मंडळाकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

पुराच्या पार्श्वभूमीवर समन्वय समितीने केलेल्या मदतीच्या आवाहनाला गणेशोत्सव मंडळे उत्तम प्रतिसाद देत आहेत. अनेक मंडळांनी लाखोंची मदत तर काहींनी 10 दिवसांमध्ये दानपेटीत जमा होणारी निधी देण्याचे जाहीर केले आहे.
-नरेश दहिबावकर, अध्यक्ष बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

मंडप उभारणीची परवानगी प्रक्रिया
गणेशोत्सव, नवरात्र, ईद आदींसारखे उत्सव मुंबईत मोठ्याप्रमाणात साजरे केले जातात. या सणांची ऐतिहासिक पार्श्वभूमी विचारात घेऊन मुंबई महापालिका अधिनियम 1888 च्या कलम 317 च्या तरतुदींच्या अंतर्गत विशिष्ट अटी व शर्तींच्या सापेक्ष तसेच पोलिस आयुक्तांच्या सहमतीने रस्ते व पदपथ यावर मंडप, तात्पुरते कक्ष उभारण्यास वैधानिक परवानगी देण्यात येते. पालिकेने अशाप्रकारे परवानगी देतानाच ‘पादचारी’ प्रथम हे धोरण निश्चित केले आहे. जेणेकरून पादचार्‍यांना वाहनांच्या गर्दीतून चालणे भाग न पडता पदपथांवरून मुक्तपणे चालता यावे. न्यायालयाने 17 जुलै 2015 रोजी दिलेल्या निर्देशानुसार त्याची अंमलबजावणी केली जात आहे. महापालिकेच्या रस्त्यांवर तसेच पदपथांवर तात्पुरते बांधकाम करून कोणतेही उत्सव साजरा करावयाचा असल्यास वाहतूक पोलीस विभाग व संबंधित पोलीस ठाण्यांद्वारे पोलीस आयुक्तांची परवानगी पूर्व सहमती घेणे बंधनकारक करण्यात येते. त्यानुसार उत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जावर परवानगी प्रक्रीया एकाच माध्यमातून पूर्ण केली जाते.

- Advertisement -

मुंबईत 2105 मंडळांच्या मंडपांना परवानगी
मुंबईतील 3619 गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेकडे अर्ज केले असून त्यातील 320 मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. तर आतापर्यंत 2105 उत्सव मंडळांना मंडप परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत मागील वर्षी 13 हजार 347 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी झाली होती. परंतु या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तुलनेत महापालिकेकडे केवळ 30 टक्के मंडळांनी मंडप परवानगीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे त्यातील केवळ 17 टक्के मंडळांच्या मंडपांना परवानगी देण्यात आाली आहे.

आकडेवारी
परवानगीसाठी आलेले अर्ज : 3619
बनावट अर्जांची संख्या : 600
पडताळणी झालेल्या अर्जांची संख्या : 3019
परवानगी दिलेल्या मंडळांची संख्या : 2105
परवानगी नाकारलेली मंडळे : 320
परवानगीची प्रक्रीया सुरु असलेले अर्ज:594

यंदा मुंबईतील प्रमुख आर्कषणे
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवसाठी मुंबई अशरक्ष: सजून निघाली आहे. घरगुती गणेशोत्सव प्रमाणे मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अवघ्या महाराष्ट्राचे केंद्रबिंदू ठरतात. त्यानुसार यंदा मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये कोणती मंडळे यंदा देखील सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहेत, त्यांचा घेतलेला हा आढावा

लालबागचा राजा
कोट्यावधी भाविकांचा श्रध्दास्थान असलेला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून गणेशभक्त मोठ्या प्रमाणात लालबाग गाठत असतात. यंदा मंडळाचे ८६ वे वर्ष असून त्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठानेसाठी राजमहलची प्रतिकृती बनविण्यात येत आहे. बाप्पाची आर्कषक मुर्ती आणि प्रभावळ हे येथील आर्कषणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असणार्‍या या गणपतीचे मुखदर्शन आणि नवसाची रांग अशा दोन पध्दतीने भक्तांना दर्शन घेता येत असल्याची माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली.

गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
आपल्या आर्कषक देखाव्यासाठी आणि उंच मुर्तीसाठी प्रसिद्ध असणार्‍या लालबाग येथील गणेशगल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे मंडळाचे ९२ वे वर्ष आहे. यंदा मंडळाने अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी प्रमाणे मंडळाने यंदाही सामाजिक कामांच्या माध्यमातून मुंबईतील इतर मंडळांसमोर आपला वेगळा आदर्श ठेवला आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी
शतक महोत्सवी वर्षे साजरा करणारे हे मंडळ मुंबईतील गणेशोत्सवामध्ये आगमनाधीश म्हणून प्रसिद्ध आहे. १०० वर्षांनिमित्त आर्कषक देखावा आणि मनमोहक गणेशमूर्ती हे प्रमुख आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीतील विशेष आरती हे देखील या मंडळाचे वैशिष्ट्ये आहे. दरवर्षी मंडळांकडून अनेक सामाजिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येते.

काळाचौकीचा महागणपती
आपल्या पारंपारिक मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेले काळाचौकी येथील काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा प्रति पंढरपूरचे प्रतिकृती उभारण्यात आली आहे. देखाव्याला साजेशी असी विठ्ठलरुपी १८ फूटी गणेशमूर्ती मुंबईकरांच्या आर्कषणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
स्वर्ण गणपती म्हणून नावलैकिक असणारा मुंबईतील प्रमुख गणेशोत्सव मंडळापैकी एक मंडळ म्हणजे जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. वडाळा येथे या बाप्पाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठाना करण्यात येते. १९५४ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

अंधेरीचा राजा
कामगार वर्गांनी एकत्र येऊन या गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. मुंबईतील प्रमुख मंडळापैकी एक मंडळ असून याठिकाणी ही भाविकांसह सेलिब्रेटी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. अनंत चतुर्थीनंतर येणार्‍या संकष्ठीच्या दिवशी म्हणजे 21 दिवसांने येथील बाप्पाची विर्सजन मिरवणुक काढण्यात येते.

गणपतीच्या आगमनासाठी बाजारपेठा फुलल्या

सात दिवसांवर आलेल्या गणरायाच्या आगमनाच्या तयारीला आता जोरात सुरुवात झाली आहे. त्यामुळे विविध शोभेच्या वस्तू, इकोफ्रेंडली मकर, प्लास्टिकची फुले, कंठी, माळा व विविध प्रकारच्या आकर्षक लायटिंगची तोरणांनी दादर, क्रॉफर्ट मार्केट, कुर्ला या बाजारापेठा सजल्या फुलल्या आहेत. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

प्रत्येक सणाचा रंग वेगळा असतो. हा रंग मुंबईतील विविध बाजारपेठांमध्ये हमखास दिसतो. आठवड्यावर आलेल्या गणरायाच्या आमगनाचाही विशेष रंग आता बाजारपेठांवर दिसू लागला आहे. गणरायाच्या आरास सजावटीसाठीच्या विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. यामध्ये बोर्डपासून व कागदी पुठ्ठ्यापासून बनवलेले विविध प्रकारचे इकोफ्रेंडली मखर, कंठी हार, माळा, चायनीज तोरणे, फुलांच्या आरास, विजेच्या माळा, पूजेचे साहित्य, गणपतीचे सोन्याचे दागिने, मोदक प्रसादाचे साहित्य, दूर्वा, केळीची पाने अशा साहित्यांनी बाजारापेठा फुलल्या आहेत.

प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी असल्याने बाजारांमध्ये थर्माकोलचे मकर दिसत नसले तरी प्लास्टिकची आर्टिफिशयल चायनीज फुलांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. ही फुले 150 रुपयांपासून असल्याने नागरिकांच्या पसंतीस पडत आहे. तर इकोफ्रेंडली मकरची किंमत ही तीन हजारांपासून 12 हजारांपर्यंत आहे. इकोफ्रेंडली मकर थर्माकोल मकरच्या तुलनेत महाग असल्याने दुकानदारांच्या व्यवसायावर मोठा फरक पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत अद्यापपर्यंत 50 टक्क्यांपेक्षा कमी मकरची विक्री झाल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येते आहे. इकोफ्रेंडली मकर खरेदीकडे अद्याप ग्राहकांचा कल वाढला नसला तरी प्लास्टिकची फुले, तोरणे, माळा, फुलांच्या आरास, विजेच्या माळा खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक असल्याचे दिसून आले. सजावटीचे विविध साहित्य खरेदीसाठी दादर बाजारपेठेतील रानडे रस्ता, आयडियल गल्ली, फूल मार्केट रविवारी सकाळपासून नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मखरापासून आरास करण्यासाठी लागणार्‍या शोभेच्या माळांपर्यंत, पूजा साहित्यापासून ते फुलांपर्यंत सगळ्याच गोष्टी खरेदी करण्यासाठी रस्त्यांवर झुंबड उडाली होती.

इकोफ्रेंडली मखर महाग व फारसे आकर्षक नसल्याने ते खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल कमी आहे. त्यामुळे आमच्या व्यवसाय गतवर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी कमी झाला.
– दिनेश बाणे, मखर विक्रेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -