कंगना रानौतला वाय-प्लस सुरक्षा

अभिनेता सुशांत सिंह संशयित मृत्यू प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेकडून हल्ल्याची धमकी मिळालेली चित्रपट अभिनेत्री कंगना रानौतला केंद्र सरकारने ‘वाय-प्लस’ दर्जाची सुरक्षा दिली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कंगना रानौतने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत.

मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कंगना रानौतवर शिवसेनेने टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत आल्यानंतर धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या रणरागिणी कंगना मुंबईत आल्यावर तिचे थोबाड फोडतील, अशी धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा दिली आहे.

केंद्राकडून सुरक्षा दिल्यानंतर कंगनाने देखील ट्विट करत अमित शाह यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, आता कोणत्याही देशभक्ताचा आवाज दाबला जाणार नाही हे यावरुन सिद्ध होत आहे. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानते. त्यांना वाटले असते तर ते मला काही दिवसांनंतर मुंबईत जाण्याचा सल्ला देऊ शकले असते. मात्र, त्यांनी भारताच्या या मुलीचा मान राखला आहे. त्यांनी माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची रक्षा केली आहे. जय हिंद.

हे माझे मुंबईमधील मणिकर्णिका फिल्मचे ऑफिस आहे. १५ वर्षे मेहनत करून मी हे उभे केले आहे. जेव्हा मी चित्रपट निर्माती होईल तेव्हा माझे स्वत:चे ऑफिस असावे, असे माझे स्वप्न होते. मात्र, आता माझे हे स्वप्न तुटताना मला दिसत आहे. माझ्या ऑफिसमध्ये अचानक मुंबई महानगरपालिकेचे काही लोक शिरले आहेत.
-कंगना रानौत.