कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र नवे, साहित्य जुनेच

जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा रुग्णांना फटका

Mumbai

शहापूर तालुक्यातील कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दर्जेदार इमारतीच्या उद्धघाटनानंतर देखील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. या ठिकाणी येणार्‍या रुग्णांना सेवा देताना आरोग्य केंद्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना जुन्याच साहित्यांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी आर्थिक भूर्दंड सहन करून तालुक्याच्या ठिकाणी जाणे भाग पडत आहे.

ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागा अंतर्गत येणारे सर्वात मोठे 21 गाव आणि 98 पाड्यातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवणारे आरोग्य केंद्र म्हणजे कसारा आरोग्य केंद्र. याठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून नवीन इमारतीच्या बांधकामामुळे आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची गैर सोय होती. नुकतेच नवीन इमारतीचे उद्घाटन होऊन महिना उलटला नाही तर इथल्या आरोग्य सेवेची वाताहत कायम असल्याची आजही दिसून येत आहे.

आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत आंतररुग्ण कक्ष सुरू झाला असल्याची पाटी लागली आहे. परंतु त्यात खाटांचा तुटवडा असल्याने रुग्णांना उपचार भरतीसाठी खर्डी व शहापूर रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. शिवाय रुग्णांच्या उपचाराला लागणारे साहित्य जुने तर आहेच त्यातही अपुरे आहे. या बाबत संबंधित तालुका अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

निधी उपलब्ध झाल्यानंतर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात लागणारे नवीन साहित्य जिल्हा स्तरावर खरेदी करण्यात येतील. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी, हाच आरोग्य विभागाचा उद्देश आहे.
– डॉ.टी.धानके, तालुका आरोग्य अधिकारी, शहापूर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here