घरमुंबईगणेश मंडळांची अधिकृत वीज जोडणीकडे पाठ

गणेश मंडळांची अधिकृत वीज जोडणीकडे पाठ

Subscribe

महावितरणचे यंदाच्या वर्षी मंडळांना आवाहन

मुंबईत गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होत असला तरीही अधिकृत वीज जोडणी घेण्यासाठी मंडळाकडून टाळाटाळ होत असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातून २२०० गणेशोत्सव मंडळे आहेत. पण अतिशय मोजक्या मंडळाकडूनच वीज वापर हा अधिकृत वीज जोडणी घेऊन करण्यात येत आहे.

महावितरणच्या भांडूप परिमंडळात गेल्यावर्षी तुरळकच प्रतिसाद मिळाला. महावितरणच्या वाशी परिमंडळात १६२ मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली. तर ठाण्यात ४७३ मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली. तर नाशिकमध्ये २५४ मंडळांकडून अधिकृत वीज जोडणी घेण्यात आली. मुंबईच्या बेस्ट उपक्रमाच्या अखत्यारीत १६५२ गणेशोत्सव मंडळांनी अधिकृतपणे वीज जोडणी घेतली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दराने वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणमार्फत करण्यात आले आहे. राज्य वीज नियामक आयोगाने सणासुदीच्या काळातील तात्पुरत्या वीज पुरवठ्यासाठी ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट वीजदराने वीज देण्याचा निर्णय याआधीच जाहीर केला आहे. गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन वीज कंपन्यांकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रति युनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हिलींग) आकार असे वीजदर आहेत. गणेश मंडळांना प्राधान्याने वीज जोडणीसाठी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वीजभार ०.५ किव्होकरिता एक हजार रूपये वीजजोडणी खर्च आकारण्यात येईल. मंडळाच्या वीजभारानुसार सुरक्षा ठेव रक्कम आकारण्यात येईल. गणेशोत्सव संपल्यानंतर ही रक्कम मंडळाच्या खात्यात महावितरणकडून ऑनलाईनद्वारे परतावा करण्यात येईल. मंडळाने सुरक्षिततेच्या जबाबदारीबाबत स्वत:चे प्रमाणपत्र (सेल्फ सर्टीफिकेशन), बँक खात्याची माहिती व मेाबाईल क्रमांक द्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज जोडणी तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता आहे. पावसामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजयंत्रणेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. गणेश मंडपातील वीजयंत्रणेची दैनंदिन तपासणी करण्यात यावी. तातडीच्या मदतीसाठी गरज भासल्यास 24 तास सुरु असणार्‍या टोल फ्री क्रमांक 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या महावितरणच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -