मुंबईतील भीषण प्रकार! मृताचा आत्मा शांत करण्यासाठी घेतला जिवंत व्यक्तीचा जीव!

प्रातिनिधिक छायाचित्र

अंधश्रद्धा आणि शहरी राहणीमान यांचा काहीही संबंध नसल्याचं आजवर अनेक घटना समोर आल्या आहेत. चक्क देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील अशाच अंधश्रद्धेसाठी चक्क एका वृद्धाची सुपारी देऊन हत्या केल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी दुसऱ्या एका वृद्धाचा बळी द्यायला हवा, अशा अंधश्रद्धेतून उत्तर मुंबईतल्या मुलुंडमध्ये एका ७० वर्षीय वृद्धाची हत्या झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. गुन्हा नक्की कसा घडला, हे समजल्यानंतर काही काळ पोलीस देखील चक्रावून गेले होते. खुद्द आरोपींनीच आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर अखेर पोलिसांना सगळा प्रकार समजला. या गुन्ह्यात हात असलेल्या ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दीपक मोरे (३८), विनोद मोरे (३०), आरिफ नसीर शेख (२७), मोईनुद्दीन अल्लाउद्दीन अन्सारी उर्फ साहिल (२७), आरिफ अब्दुल सत्तार खान (३०) शहनवाझ उर्फ सोनू अख्तर शेख (३०) असे अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत.

कसा घडला गुन्हा?

दीपक मोरे आणि विनोद मोरे हे दोघे सख्खे भाऊ असून काही महिन्यांपूर्वी त्यांच्या वडीलांचा आजारामुळे मृत्यु झाला होता. आपल्या वडिलांवर समाजातील कोणीतरी करणी केली असून त्यांचा आत्मा अजूनही अशांत आहे. आत्म्याची शांती करणं गरजेचं आहे. त्यासाठी समाजातल्याच दुसऱ्या एका व्यक्तीचा बळी द्यावा लागेल, असा उपाय कुणीतरी त्यांना सांगितला. झालं. त्यावर विश्वास ठेऊन या दोघा भावांनी सहज हत्या करता येईल, अशा व्यक्तीचा शोध सुरू केला.

काही काळ शोध घेतल्यानंतर…

त्यांची नजर मुलुंड पश्चिमच्या विजय नगरमध्ये राहणाऱ्या मारूती गवळी यांच्याकडे गेली. मारूती गवळी यांचं वय होतं ७० वर्ष. त्यामुळे त्यांना मारताना त्यांच्याकडून प्रतिकार होण्याची शक्यता कमी होती. शिवाय ते रस्त्याच्या कडेला एका दुकानाच्या आडोशाला कटलरीचा व्यवसाय करायचे आणि रात्री तिथेच झोपायचे. व्यवस्थित रेकी करून मोरे भावांनी काही भाड्याच्या गुंडांना मारूती गवळी यांच्या हत्येची सुपारी दिली.

गवळींना मारण्यासाठी मोरे बंधूंनी…

भाड्याच्या हल्लेखोरांना ७० हजारांची सुपारी दिली आणि २ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मारुती गवळी यांचा मृतदेह विजय नगर समोर असणाऱ्या सिल्वरग्लास दुकानाजवळ छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना सापडला. मुलुंडमध्ये खळबळ उडाली. मारुती गवळी यांच्या डोक्यात दगड टाकून तसेच त्याच्या पोटात छातीत धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. मुलुंड पोलिसानी मृतदेह ताब्यात घेऊन अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

..आणि आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली!

परिमंडळ ७चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश ढसाळ, पोनि वारके, यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, सचिन कदम, विजय सांडभोर इतर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि पथकानं या गुन्ह्याचा तपास सुरू केला. काही दिवसांनी मारुती गवळी यांच्या हत्येसाठी दीपक मोरे आणि विनोद मोरे या भावांनीच भाड्याच्या गुंडांना ७० हजार रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी मोरे बंधूंना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृत वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मारुती गवळी यांचा बळी दिल्याचा जबाब त्यांनी पोलिसांना दिला. यानंतर पोलिसांनी दोन्ही सख्ख्या भावांसह ४ मारेकरी अशा एकूण ६ जणांना मंगळवारी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली. या प्रकारामुळे मुलुंडमध्ये खळबळ उडाली असून अंधश्रद्धेची पाळंमुळं किती खोलवर रुजलेली असू शकतात, याचा धक्कादायक पुरावा या घटनेनं समोर आणला आहे.