मुंबई विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षाही ऑनलाईन

सत्र परीक्षा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये होणार आहे. या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आला असून बहुपर्यायांसह वर्णनात्मक थेअरी पद्धतीने परीक्षा होईल.

मुंबई विद्यापीठ

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेतल्यानंतर आता व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आणि पारंपरिक अभ्यासक्रमच्या सत्र परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. सत्र परीक्षा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये होणार आहे. या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आला असून बहुपर्यायांसह वर्णनात्मक थेअरी पद्धतीने परीक्षा होईल.

अभियांत्रिकी, एमसीए, व फार्मसी, आर्किटेक्चर आणि पारंपरिक अभ्यासक्रमांची ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाने परिपत्रक जारी करून महाविद्यालयांना परीक्षा घेण्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने काढले आहे. यामध्ये पारंपारिक अभ्यासक्रम असलेल्या कला, वाणिज्य, विज्ञान या पदवी व व्यवस्थापन शास्त्र पदव्युत्तर परीक्षा या ३१ डिसेंबरपर्यंत तर व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा १५ जानेवारपर्यंत घेण्यात येणार आहेत. या परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील. अभियांत्रिकी, एमसीए व फार्मसी या अभ्यासक्रमाची ८० गुणांची ऑनलाईन थेअरी परीक्षा घेण्यात येईल. थेअरी परीक्षेमध्ये ४० गुणांची ऑनलाईन बहुपर्यायी परीक्षा ४० मिनिटांची घेण्यात यावी. व ४० गुणांची वर्णनात्मक थेअरी परीक्षा ८० मिनिटांची घेण्यात यावी. ही परीक्षा दोन तासांची असणार आहे. आर्किटेक्चर शाखेच्या परीक्षेसाठी २० गुणांची ऑनलाईन बहुपर्यायी परीक्षा ३० मिनिटांची आणि ३० गुणांसाठी ऑनलाईन वर्णनात्मक परीक्षा १ तासाची घेण्याच्या सुचना मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना दिल्या आहेत.

परीक्षेचे मुल्यांकन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून शिक्षकांनी परीक्षेचे मुल्यांकन ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयात करावे, अशा सुचना महाविद्यालयांना दिल्या आहेत. तसेच १५ जानेवारपर्यंत या परीक्षा घ्याव्यात, अशा सुचना विद्यापीठाने दिल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्याकडे ऑनलाईन सुविधा नसल्यास अशा विद्यार्थ्याची पर्यायी व्यवस्था करण्याची सुचनाही विद्यापीठाने केली आहे.

परीक्षा पद्धतीत बदल

विद्यापीठाने परीक्षा पद्धतीत काही बदल केले आहेत. त्यानुसार यापूर्वी २५ गुणांची परीक्षा घेण्यात येत होती. एक प्रश्न २ गुणांचा होता. यामध्ये बदल करत पारंपारिक पदवी व पदव्युत्तर परीक्षेसाठी ६० गुणांची ऑनलाईन थेअरी परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये ५० बहुपर्यायी प्रश्न देण्यात येतील. यात ४० प्रश्न विद्यार्थ्याने सोडविणे अपेक्षित आहे. एक प्रश्न आता दीड गुणांचा असणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १ तास वेळ देण्यात येणार आहे.