पालिका शाळेत विद्यार्थी, शिक्षकांना मानसिक आजाराचे धडे

स्माईलिंग स्कूल उपक्रमाअंतर्गत ३ लाख मुलांचं समुपदेशन होणार आहे. पण यापूर्वी शिक्षकांना ही मुलांना कसं ओळखायचं? त्यांना कशापद्धतीचा ताण आहे? हे समजण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

Mumbai
municipal school training about mental illness for students and teachers
मुंबई महानगर पालिका

मुंबई मनपा शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी लवकरच समुपदेशनाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत ५ वर्षांच्या टप्प्याटप्प्यात ३ लाख विद्यार्थ्यांचा तणाव आणि इतर मानसिक आजारांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी पालिका एका संस्थेसोबत काम करणार असून शाळेत लागणारे समुपदेशक उपलब्ध करुन देणार आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी आधी शिक्षकांनाही मानसिक आजाराचे धडे दिले जाणार आहेत. विशेषतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिका शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकतात. पण, अनेक शाळांमध्ये समुपदेशक उपलब्ध नसल्याचं चित्र आहे. आजच्या घडीला विद्यार्थी शाळेच्या अभ्यासाच्या तणावासोबत इतरही समस्यांसोबत लढत आहेत. यातच जर पालिका शाळेत समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करुन दिली तर त्यांना या समस्येतून बाहेर पडण्यास मदत होईल.

बदलत्या जीवनशैलीसोबत राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी आणि हातात दिलेला मोबाईल त्यातून तुटलेला संवाद यामुळे मुलांमध्ये नैराश्याचं प्रमाण वाढत आहे. त्यातून आत्महत्या ही वाढत आहेत. हाच मानसिक तणाव कमी करण्यासाठी पालिकेने ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेची मदत घेतली आहे.

३००० हजार ५० समुपदेशकांची निवड

याविषयी अधिक माहिती देताना ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेचे संस्थापक डॉ. शिशिर जोशी यांनी सांगितलं की, ‘‘हा एकूण १२०० शाळांचा प्रोजेक्ट असून ३ लाख मुलांचं समुपदेशन आणि त्यांना असलेल्या मानसिक आजाराविषयी उपचार केले जाणार आहेत. पण, या मुलांना हाताळण्यापूर्वी त्यांच्या शिक्षकांना ही मुलांना कसं ओळखायचं? त्यांना कशापद्धतीचा ताण आहे हे समजण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. सोमवारपासून या प्रोजेक्टला सुरुवात होणार आहे. ५ वी ते ८ वीतील मुलांना सामाजिक, शारीरिक आणि मानसिक सर्व प्रकारच्या समस्या समजून त्यावर उपचार केले जाणार आहेत.’’

१५० शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मानसिक आजाराचे धडे

‘‘स्माइलिंग स्कूल कार्यक्रमातंर्गत हा उपक्रम राबवला जातो आहे. त्याद्वारे यंदाच्या वर्षी मुंबईतील पालिकेच्या १५० शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मानसिक आजाराचे धडे दिले जाणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित शाळांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाईल. याशिवाय दर महिन्याला समुपदेशक शाळांमध्ये जाऊन शिक्षकांशी संवाद साधतील. त्यात एखाद्या विद्यार्थ्याला समुपदेशनाची गरज असल्याचं शिक्षकांनी सांगितल्यास त्याचं समुपदेशन केलं जाईल’’, असं डॉ. जोशी यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here