मोठ्या भावाची हत्या करून रचला चोरीचा बनाव

पोलिसांच्या संशयामुळे गुन्हा उघड, दोघे अटकेत

Mumbai
arrest
आरोपीला अटक

घरात घुसलेल्या चोरट्यांनी मोठ्या भावाची हत्या केल्याचे खोटे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणार्‍या लहान भावासह त्याच्या मित्राला जुहू पोलिसांनी शिताफीने अटक केली. हा प्रकार विलेपार्ले पश्चिम येथील नेहरू नगर परिसरात घडला. रामकुमार झा (२६) आणि मुकेश भगत असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. विलेपार्ले पश्चिम येथील नेहरू नगर झोपडपट्टी या ठिकाणी शिवकुमार झा (३५) हा लहान भाऊ रामकुमार झा आणि पत्नी सोबत राहत होता. दोघेभाऊ सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते, शिवकुमार हा रात्रपाळीला कामावर असल्यावर भाऊ रामकुमार हा आणि शिवकुमारची पत्नी हे दोघे घरी एकटेच असायचे.

आपला भाऊ रामकुमार हा आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवून असल्याचा संशय शिवकुमार आपल्या भावावर घेत होता, यामधून दोघांमध्ये अनेक वेळा भांडणदेखील झाले. काही आठवड्यापूर्वी शिवकुमार याची पत्नी गावी गेली होती. शिवकुमार आणि राजकुमार हे दोघेच घरी होते. या दरम्यान भाऊ शिवकुमार हा आपल्यावर सतत संशय घेतो. नेहमी आपल्यासोबत भांडतो, म्हणून राजकुमार याने भावाला कायमची अद्दल घडवायची असे ठरवले. यासाठी त्याने मित्र मुकेश याच्या मदतीने गेल्या आठवड्यात भावाला दारूमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून दारू पाजली. त्यानंतर नायलॉनच्या दोरीने शिवकुमार याचा गळा आवळून हत्या केली. राजकुमार आणि त्याचा मित्र मुकेश या दोघांनी शिवकुमार याचा मोबाईल फोन फेकून दिला आणि घरातील सामान अस्ताव्यस्त करून घरात चोरी झाली आणि चोराने भावाला ठार केल्याचा बनाव रचला. त्यानंतर रामकुमार हा स्वतः जुहू पोलीस ठाण्यात जाऊन भावाची हत्या झाल्याची तक्रार दिली.

जुहू पोलिसानी अज्ञात इस्माविरुद्ध चोरी आणि हत्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र हा शिवकुमारची हत्या चोरीच्या उद्देशाने झाली नसावी, या हत्यामागे वेगळेच कारण असल्याचा संशय पोलिसांना आला. जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी संशयावरून रामकुमारला ताब्यात घेऊन त्याची उलटतपासणी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. भाऊ शिवकुमार हा माझ्यावर संशय घेत होता म्हणून त्याची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. जुहू पोलिसांनी रामकुमार आणू त्याचा मित्र मुकेश या दोघांना सोमवारी अटक केली असून त्यांच्या विरुद्ध हत्या, पुरावा लपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकर्णी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वपोनी वाव्हळ यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here