घरमुंबईबेस्ट संपावरील चर्चेसाठी विरोधकांचा ठिय्या

बेस्ट संपावरील चर्चेसाठी विरोधकांचा ठिय्या

Subscribe

मुंबईत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपाबाबत बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी याचा निषेध व्यक्त करत सभा तहकुबी मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, समिती अध्यक्षांनी सभा तहकुबी विचारातच न घेता विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करत कामकाजाला सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सत्ताधारी शिवसेनेचा निषेध करत सभात्याग केला आणि अध्यक्षांच्या दालनाबाहेरच ठिय्या मांडला. नियमानुसार सभा तहकुबी मांडूनही त्यांना बोलू दिले नाही. त्यामुळे संपावर चर्चा करण्यास सत्ताधारी शिवसेना घाबरली असून त्यामुळेच त्यांनी सभा तहकुबीचे निवेदन पटलावर घेतले नसल्याचे बोलले जाते.

बेस्टमधील कामगारांच्या विविध मागण्यांबाबत शिवसेनाप्रणित कामगार सेना वगळता उर्वरित सर्व कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. सोमवारपासून सलग दुसर्‍या दिवशी सुरू असलेल्या बेस्ट संपावर तोडगा काढण्यात अद्याप सत्ताधारी शिवसेना पक्ष व प्रशासन अपयशी ठरली. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना पक्षच जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी याचा निषेध करण्यासाठी सभा तहकूब करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. बैठकीच्या अर्धा तास आधी तहकुबीचे निवेदन देऊनही प्रत्यक्षात सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. अध्यक्ष यशवंत जाधव यांनी त्या निवेदनाचा विचार केला नाही. एवढेच नव्हे तर राखी जाधव यांच्यासह विरोधी पक्षनेते रवी राजा, सपाचे गटनेते रईस शेख, काँग्रेस नगरसेवक आसिफ झकेरिया, कमरजहाँ सिद्दीकी यांनी ही बाब अध्यक्षांच्या लक्षात आणूनही त्यांनी त्यांच्याकडे न पाहता कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

भाजपचा सेनेच्या भूमिकेला पाठिंबा
या गोंधळात सात प्रस्ताव मंजूर झाले. त्यामुळे अखेर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी याचा निषेध म्हणून सभात्याग केला. परंतु, यावर भाजपाचे गटनेते मनोज कोटकसह त्यांच्या सदस्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता बसून राहणे पसंत केले. त्यामुळे संप मोडीत काढण्यासाठी प्रयत्नशीर असलेल्या शिवसेनेला भाजपाचा छुपा पाठिंबा असल्याचे यावरून स्पष्ट होत होते. संपाबाबत भाजपा गटनेत्यांनी कोणतीही भूमिका न मांडता मौन बाळगत विकासाचे प्रस्ताव मंजूर करण्यात धन्यता मानली. त्यामुळे शिवसेना, भाजपाला संपामुळे मुंबईकरांचे होणारे हाल महत्त्वाचे नसून विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करणे महत्त्वाचे असल्याचे दिसून आले.

कामगार उपाशी… सत्ताधारी तुपाशी
कामगार उपाशी… सत्ताधारी तुपाशी, अशा घोषणा देत विरोधकांनी अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. तब्बल दीड तास आंदोलन केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, स्थायी समितीत बोलू न देता मनमानी कारभार करणार्‍या अध्यक्षांचा त्यांनी तीव्र निषेध केला. संपामुळे मुंबईकर बेहाल झाल्यामुळे कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी चर्चेची मागणी केली होती. संपामुळे कामगारांना घरे खाली करायला लावणे अन्यायकारक आहे. बेस्टने त्यांना मेस्मा लावावा. मात्र, या संपाला महाव्यवस्थापकच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. तर संपावर चर्चा न करता स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर करण्यात अध्यक्षांनी मानलेली धन्यता ही सत्ताधारी पक्षाची मानसिकता दर्शवते आहे. आपण केवळ चर्चा व्हावी म्हणून सभा तहकुबी मांडली होती. परंतु, अध्यक्ष नियमानुसार कामकाज न करता गळचेपी करत असल्याचा आरोप राखी जाधव यांनी केला.

- Advertisement -

सभा तहकुबी विचारात घेणे हा माझा अधिकार आहे. परंतु, विरोधी पक्षाने दिलेली सभा तहकुबी ही १५ मिनिटांपूर्वी मिळाली. विरोधक केवळ राजकारण करण्यासाठी ही सभा तहकुबी मांडत आहेत. परंतु, यावर चर्चा करून सभात्याग करत निघून जायचे आणि आमचे ऐकायचे नाही, असेच आजवरचे त्यांचे धोरण आहे. त्यामुळेच त्यांच्या सभा तहकुबीचा विचार करण्यात आला नाही.
– यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -