परवानगी फांद्या छाटण्याची, पण केली झाडांची कत्तल !

ठाण्यातील प्रकार पर्यावरण अभ्यासकांकडून उजेडात , पालिकेच्या सुट्टीचा असाही गैरफायदा !

mumbai

झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सर्वत्र दिला जात असतानाच, ठाण्यात मात्र या संदेशाची एैशी कि तैशी झाल्याचेच दिसून येते. ठाण्यात खुलेआमपणे झाडांची कत्तल सुरू आहे. दुसरा शनिवारी पालिका कार्यालयाला सुट्टी असल्याची संधी साधत ठाण्यातील मनोरमानगरमध्ये वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. एकिकडे फांद्या छाटण्याची परवानगी घेऊन दुसरीकडे झाडांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार पर्यावरण अभ्यासक रोहित जोशी यांनी पालिका अधिकार्‍यांच्या मदतीने उजेडात आणलाय. त्यामुळे झाडांची कत्तल करणार्‍यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठाणे शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून विविध ठिकाणी झाडांची कत्तल सुरू आहे. तसेच खाडी किनारी असलेल्या तिवरांची कत्तल केली जात असल्याने या विरोधात पर्यावरण अभ्यासकांनी आवाज उठवित न्यायालयातही धाव घेतली आहे. मात्र तरी सुध्दा शहरात झाडांची कत्तलीचे प्रकार अजूनही थांबलेले नाही. ठाण्याच्या मनोरमानगर परिसरात अनेक वर्षे जुनी माडाची आणि नारळाची अशी सात ते आठ झाडं आहेत. इथल्या चाळीच्या आड ही झाड येत होती. वृक्षांची फळे व झावळ्या धोकादायक असल्याने ती छाटण्याची परवानगी मिळावी यासाठी स्थानिक रहिवासी महादेव पटेल यांनी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे अर्ज केला होता.

मात्र खासगी जागेत ही झाडं असल्याने काही अटींवर पालिकेने फांद्या छाटण्यास परवानगी दिली. मात्र पालिकेने त्यांना केवळ फांद्या छाटण्याची परवानगी दिली असून झाडाला कोणतीही इजा होऊ नये किंवा तोडण्यात येऊ नये. असेही परवानगीत स्पष्ट बजावले आहे. मात्र संबधितांनी फांद्या छाटण्याची परवानगी घेत झाडांची कत्तल केली आहे. दुसर्‍या शनिवारी पालिकेला सुट्टी असल्याने दुपारी वृक्षांची कत्तल करण्यात आली. हा प्रकार पर्यावरण अभ्यासक जोशी यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वृक्षतोड करण्यास अटकाव केला. पालिकेचे वृक्ष अधिकारी भूषण तायडे यांना बोलावले. त्यामुळे उर्वरित झाडे वाचवली गेली. वृक्षतोड प्रकरणाची पालिकेने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. अशीही मागणी त्यांनी केली आहे.

मनोरमानगर परिसरातील जुनी माडाच्या झाडांची कत्तल करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. पालिकेला सुट्टी असल्याने पालिकेचे वृक्ष अधिकारी भूषण तायडे यांना फोन करून हा प्रकार सांगितला. आम्ही जागेवर पोहचलो तोपर्यंत तीन मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली होती. चार झाडे वाचली गेली. प्रशासनातील अधिकार्‍यांना सतर्क केल्यानंतरही सदरची वृक्षतोड थांबिवण्यास अधिकारी असमर्थ ठरले आहेत. पालिकेच्या कार्यालयाला सुट्टी असल्यानंतर हे प्रकार घडतात त्यामुळे सुट्टीच्या दिवशी एक अधिकारी व कर्मचारी असणे गरजेचे आहे.
रोहित जोशी, पर्यावरण अभ्यासक

संबधितांनी पालिकेकडून फांद्या छाटण्याची परवानगी घेतली होती. मात्र प्रत्यक्षात वृक्षतोड झाल्याचा प्रकार घडला आहे. वृक्ष अधिकारी भूषण तायडे व पर्यावरण अभ्यासक रोहित जोशी हे घटनास्थळी उपस्थित होते. आम्ही ही वृक्षतोड करण्यास मनाई केली होती. वृक्षतोड करणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्यामळे वृक्ष तोडीस जबाबदार असलेल्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
-पद्मा भगत, स्थानिक नगरसेविका

वृक्ष प्राधिकरणाचे भिजत घोंगडे
वृक्ष प्राधिकारणावर नियमबाह्य पद्धतीने राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका करण्यात आल्याने वर्षभरात तीन वेळा वृक्ष प्राधिकरण बरखास्त करण्याची नामुष्की ठामपावर ओढवली आहे. आताही नेमण्यात आलेल्या समितीवर 2 सदस्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत शंका उपस्थित करत याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात यावर आक्षेप घेतला आहे. येत्या सोमवारी याबाबत सुनावणी होणार असून वृक्ष प्राधिकरणाचा फैसला होण्याची शक्यता आहे. गेले वर्षभर वृक्ष प्राधिकरण स्थापन झालेले नाही. त्यामुळे डिसेंबर 2017 पासून वृक्षतोडीवरील बंदी कायमच आहे.

…तर दंड अथवा कारावास
पालिकेच्या अटी व शर्थीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार प्रत्येक अपराधाकरीता एक हजार ते पाच हजार रूपयांपर्यंत दंड आहे. अथवा एक वर्षे कारावास अशी शिक्षा असल्याचेही पालिकेच्या सहाययक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी डॉ.अनुराधा बाबर यांनी परवानगी पत्रात नमूद केलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here