माहुलीचे गडाचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी पर्यटकांच्या प्लास्टिक वापरावर बंदी

माहुली गडाचे जंगल प्लास्टिक मुक्त करण्यासाठी वन्यजीव विभागाने पुढाकार घेतला आहे. जंगलात प्लास्टिकच्या वस्तू नेणाऱ्या पर्यटकास २०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

shahapur
plastic ban on mahuli fort
माहुलीचे गडाचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी पर्यटकांना प्लास्टिक वापरावर बंदी

शहापूर जवळील माहुली गडावर इतिहास संशोधक, गिर्यारोहक, निसर्गप्रेमी पर्यटक येथे मोठ्या प्रमाणावर येत असतात. हे पर्यटक गडावर येताना सोबत प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पत्रावळ्या यांचा बिनधास्त वापर करतात. पर्यटकांनी सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या वस्तू माहुलीच्या जंगलात फेकून दिल्या जातात. परिणामी यामुळे मोठया प्रमाणावर जंगलात प्लास्टिकचे प्रदुषण होते. जंगलातील या प्लास्टिक आणि अन्य वस्तुंच्या
कचऱ्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास वन्यजीवांना सहन करावा लागतो. जंगलातील प्लास्टिकच्या वस्तूंचा पशुपक्ष्यांच्या जीविताला देखील धोका निर्माण होण्याची भीती आहे. यामुळे माहुलीचे जंगल प्लास्टिक मुक्त करण्यासाठी खर्डी वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी आणि माहुली ग्राम परिस्थितीकीय समिती यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे.

पर्यटकाकडे प्लास्टिक आढळल्यास २०० रुपये दंड

माहुली गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. माहुलीच्या जंगलात प्लास्टिक साहित्य कोणी आणले तर त्या पर्यटकाचे संपूर्ण नाव त्याचे राहण्याचे ठिकाण आणि त्याने सोबत एकूण किती प्लास्टिक साहित्य आणले आहे याची रितसर लेखी नोंद दैनंदिन माहुली ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती कडुन ठेवली जात आहे. जे पर्यटक प्लास्टिक साहित्य आणतील अशा पर्यटकांकडून २०० रुपये रोख दंडाच्या स्वरुपात घेतले जात आहेत. यापुढे प्लास्टिक पिशव्या आणि अन्य साहित्य गडावर, जंगलात आणू नये अशी सुचना आणि सक्त ताकीद येणाऱ्या पर्यटकांना दिली जात आहे असे वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले.

माहुली गडावर जनजागृती सुरू

जंगलात प्लास्टिक वापरण्याचे काय दुषपरीणाम होत आहेत ते त्यांना पटवून दिले जात आहे यातून पर्यटकांना प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला जात आहे. सध्या अशा प्रकारे जनजागृती माहुली गडावर सुरु आहे. काही पर्यटकांनी सोबत आणलेला प्लास्टिक साहित्य जंगलात फेकून न देता तो प्लास्टिक कचरा वेचून गोळा करुन परत आपल्या सोबत नेल्यास अशा पर्यटकांचे दंड म्हणून आगाऊ घेतलेले २०० रुपये त्यास परत केले जात आहेत.

वन्यजीव विभाग खर्डी आणि माहुली ग्राम विकास समितीच्या संयुक्त झालेल्या बैठकीत माहुली गडावर आणि जंगलात प्लास्टिकच्या वस्तू घेऊन जाणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. माहुलीचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी हे जंगल प्लास्टिक मुक्त करण्याचा आम्ही संकल्प हाती घेतला आहे. – दर्शन ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव विभाग खर्डी