प्रकाश आंबेडकरांनी केली बंद मागे घेण्याची घोषणा!

Mumbai
prakash ambedkar
प्रकाश आंबेडकर

नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरीक नोंदणी या कायद्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पुकारलेला बंद अखेर मागे घेतला आहे. दुपारी ३ च्या सुमारास त्यांनी मुंबईतील दादरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यासंदर्भात घोषणा केली. ‘वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झालेला आहे. महाराष्ट्रभरातल्या सुमारे १०० संघटनांनी बंदला पाठिंबा दिला होता. मात्र, बंदमुळे जनजीवनावर परिणाम होऊ नये, म्हणून बंद मागे घेत आहोत’, असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं. दरम्यान, घाटकोपरमध्ये बसवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेमध्ये वंचितच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा हात नसल्याचा दावा यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केला.

सुनील खांबे बंदचे आवाहन करत असताना त्यांना अटक

सुनील खांबे बंदचे आवाहन करत असताना त्यांना अटक

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜನವರಿ 24, 2020

घाटकोपर, अमरावतीमधील घटना…

आज सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून बंद यशस्वी करण्यासाठी घोषणाबाजी सुरू केली होती. दरम्यान, घाटकोपर आणि अमरावतीमध्ये घडलेल्या घटनांमुळे बंदला हिंसक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. घाटकोपरमध्ये बेस्टच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये समोरची काच फुटून बस चालक जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यासोबतच अमरावतीमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता.

‘आमच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली नाही’

घाटकोपरमधील घटनेविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘आमच्या कार्यकर्त्याने बसवर दगडफेक केलेली नाही. रुमाल बांधून बंदमध्ये सहभागी व्हायचे नाही, असे आदेशच आम्ही कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र, ज्यांनी दगडफेक केली, ते रुमाल बांधून आले होते आणि नंतर पळून गेले.’ दरम्यान, यावेळी अमरावतीमध्ये घडलेल्या घटनेवर प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली. ‘कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. मात्र, नंतर तो चुकीचा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना सोडून दिलं’, असं ते म्हणाले. दरम्यान, यावेळी एनआरसी आणि सीएए कायद्याला असलेला विरोध त्यांनी पुन्हा व्यक्त केला.


वाचा सविस्तर – ‘महाराष्ट्र बंद’ला हिंसक वळण; बंदला राज्यात कुठे, कसा आला प्रतिसाद?