अंगावर झाड पडून रिक्षा चालकाचा मृत्यू

फांद्यांच्या छाटणीनंतरही उन्मळले झाड

Mumbai
(फोटो प्रातिनिधिक आहे)

पावसाळ्यात धोकादायक झाडे किंवा फांद्या पडून दुर्घटना होवू नये म्हणून महापालिकेच्यावतीने पावसाळ्यापूर्वी मृत झाडे तोडण्यात येतात. तसेच काही झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. परंतु फांद्यांची छाटणी केल्यानंतरही झाड उन्मळून पडण्याची घटना सोमवारी सकाळी मुलुंड येथे घडली. मुलुंड पश्चिम येथील एन.एस.रोडवर रिक्षावर झाड पडून रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. अशोक शिंगरे (४५) असे या मृत रिक्षा चालकाचे नाव आहे.

मुलुंड पश्चिम येथील एन.एस. रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर सोमवारी भल्या पहाटे रिक्षावर झाड पडून झालेल्या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर राजेश भंडारी हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर मुलुंडच्या वीर सावरकर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कळवले आहे. या दुर्घटनेमुळे पावसाळ्यात झाड पडून मृत्यू पावलेल्यांची संख्या आठ झाली आहे.

याबाबत स्थानिक नगरसेविका समिता कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली होती. तरीही हे झाड उन्मळून पडल्याने त्यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांना जबाबदार धरले आहे. झाडांच्या फांद्यांची छाटणी करताना, जर हे झाड आतून पोखल्याचे दिसून आले होते, तर मग तेव्हाच ते का कापले नाही,असा सवाल कांबळे यांनी केला आहे.

मुंबईतील मृत झाडे कापण्यासाठी ट्री रडार तथा रेजिस्ट्रोग्रॉफ या झाडांचा एमआरआय काढणार्‍या मशिनची खरेदी करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. परंतु उद्यान विभाग यासाठी अनूकूल असतानाही तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांनी हे यंत्र खरेदी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे या यंत्रांची खरेदी करून प्रत्येक झाडांचा तपासणी केल्यास झाड बाहेरून किती चांगले दिसत असले तरी आतून किती प्रमाणात पोखरलेे गेले आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्यांची छाटणी करताना या यंत्राद्वारे तपासणी केल्यास अशाप्रकारची झाडे पडून होणारी संभाव्य दुर्घटना टाळता येईल. त्यामुळे प्रशासन किती माणसे मेल्यानंतर या यंत्राचा विचार करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.