घरमुंबईनालासोपार्‍यातून प्रदीप शर्मांसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी?

नालासोपार्‍यातून प्रदीप शर्मांसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी?

Subscribe

उत्तर भारतीयांची निर्णायक मते लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपमधील स्थानिक इच्छुकांची चिंता वाढली आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे राजेंद्र गावीत निवडून आले आहेत. त्यांनी नालासोपारा मतदारसंघातून 26 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या मतदारसंघावर दावा ठोकण्याची शिवसेना नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून याठिकाणी तगडा उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून त्यासाठी प्रदीप शर्मा यांच्यासाठी शिंदे यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

नालासोपारा विधानसभा मतदारसंघात उत्तरभारतीयांची निर्णायक मते असल्याने शर्मा हे ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला टक्कर देऊन विजयी होऊ शकतात, अशी शिंदे यांची अटकळ आहे. गेल्या आठवड्यात शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शर्मा यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी शर्मा यांनीही लढण्याची तयारी दर्शवली असल्याचे सांगितले जाते. खरे तर शर्मा भाजपमधून अंधेरीतून विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. पण तिथून उमेदवारी मिळणे कठीण असल्याने त्यांनी आता शिवसेनेच्या तिकिटावर नालासोपार्‍यातून नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला आहे.
शर्मा यांना येत्या काही दिवसात एसीपी म्हणून बढती अपेक्षित आहे. ती झाल्यावर शर्मा राजीनामा देतील. त्यानंतर शर्मा यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहे. याबाबत गुप्तता पाळण्यात आली असली तरी नालासोपार्‍यात शर्मा समर्थकांनी जमवाजमाव सुरू केली आहे. आपल्या समर्थकांना शर्मा यांनी कामाला लावले असून त्यांच्यामार्फत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

सध्या डहाणू आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. पालघर शिवसेनेच्या ताब्यात आहे. तर वसई, नालासोपारा आणि बोईसर बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहे. यातील नालासोपारा आणि बोईसरवर शिवसेना दावा ठोकणार आहे. दुसरीकडे, पालघर जिल्ह्यातील विधानसभेसाठी भाजपमधील इच्छुकांनी नालासोपारा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कारण मागील विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपा विरोधात लढले होते. त्यावेळी भाजपाने दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवली होती. तर शिवसेना तिसर्‍या क्रमांकावर होती. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळेल असे पक्षातील इच्छुकांना वाटत आहे. पण, शिवसेनेच्या नव्या खेळीने त्यांची निराशा होणार आहे.

मी अजूनही पोलीस विभागात कार्यरत असून निवडणूक लढवण्याचा माझा कोणताही विचार नाही.
-प्रदीप शर्मा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे

नालासोपार्‍यातून प्रदीप शर्मांसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी?
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -