घरमुंबईसेव्हन हिल्स रुग्णालयाचा निकाल महापालिकेच्या बाजूने

सेव्हन हिल्स रुग्णालयाचा निकाल महापालिकेच्या बाजूने

Subscribe

सेव्हनहिल्सच्या जागेवर एम्सच्या धर्तीवर रुग्णालय उभारण्याचा मार्ग खुला

अंधेरी पश्चिमच्या मरोळ येथील रुग्णालयाची जागा सेव्हन हिल्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आली होती. ही जागा पुन्हा ताब्यात घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या याचिकेवर महापालिकेच्या बाजूने निकाल लागला आहे. त्यामुळे सेव्हन हिल्सची जागा आता महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा मार्ग खुला झाला असून आत याठिकाणी दिल्लीच्या एम्सच्या धर्तीवर रुग्णालय उभारण्याचे महापालिकेचे स्वप्न साकार होणार आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

मरोळ येथील महापालिका रुग्णालयाच्या इमारतीसह भूभाग सेव्हन हिल्स हॉस्पिटल लिमिटेड आणि सोमा इंटरनॅशनल या संयुक्त भागीदारीतील कंपनीला २००४ मध्ये देण्यात आला होता. त्यानंतर २० जानेवारी २००५ मध्ये जागेचा करार करण्यात आला आणि त्यानंतर १३ डिसेंबर २०१३ मध्ये महापालिकेसोबत केलेला सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेच्या अटी आणि शर्तीनुसार सेव्हन हिल्स रुग्णालय सुरु होते. परंतु सामजस्य करारातील अटींचा भंग केल्याने तसेच नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने, या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला महापालिकेने २४ जानेवारी २०१८ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, याबाबत अ‍ॅक्सिस बँकेने हैद्राबादमधील नॅशनल कंपनी लॉ ट्ब्यिुनलमध्ये सेव्हनहिल्स हेल्थकेअर विरोधात इन्सॉल्वन्सी पेटिशन दाखल केले होते. यामध्ये महापालिकेला त्यांनी पक्षकार केले होते. यावेळी महापालिकेने सेव्हन हिल्सकडे मालमत्ता कर म्हणून ४७.९७ कोटी रुपये तर भाड्यापोटी ९२.९१ कोटी असे एकत्रित १४०.८८ कोटी रुपये थकीत असल्याचा दावा केला होता.

- Advertisement -

मात्र, याप्रकरणात न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणांप्रकरणी डॉ.बी.आर.शेट्टी यांनी महापालिकेची देयके अटी आणि शर्तीशिवाय न्यायालयात सादर केल्याप्रमाणे देण्याचे मान्य केले आहे. परंतु, ही प्रक्रीया सुधार आणि महापालिकेच्या मान्यतेशिवाय पार पडण्याची विनंती त्यांनी केल्यामुळे त्यांचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळून लावत त्यांना दिलेल्या नोटीसप्रमाणे रुग्णालयाची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रुग्णालयाची ही जागा ताब्यात घेण्यासंदर्भातील प्रस्ताव सुधार समितीलाही सादर करण्यात आला होता. परंतु अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या विनंतीनुसार समितीने हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला होता.सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेवू नये, जेणेकरून न्यायालयाचा अवमान होईल,अशी विनंती डॉ. जोशी यांनी केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात महापालिकेची बाजू मान्य करून रुग्णालयाची जागा त्यांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रकरणी महापलिकेच्या बाजुने निकाल लागल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय बंद होत असल्याने, याठिकाणी एम्सच्या धर्तीवर रुग्णालय बनवले जावे, यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. त्यानुसार तत्कालिन मुख्यमंत्र्यांनीही केंद्रीय आरोग्य खात्याला पत्र लिहून सेव्हन हिल्सच्या जागेवर एम्सच्या धर्तीवर रुग्णालय उभारण्यास परवानगी मिळावी, अशी शिफारस केली होती. त्यामुळे हा निकाल महापालिकेच्या बाजुने लागल्यामुळे डॉ. जोशी यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार असून मुंबई महापालिकेच्यावतीने या रुग्णालयाच्या जागेवर एम्सच्या धर्तीवर सुसज्ज असे रुग्णालय उभारुन रुग्णसेवा देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -