निकालाचा फुगा फुटला !

गेल्या बारा वर्षांतील सर्वात कमी निकाल ,एकूण निकाल १२.३१ टक्क्यांनी घसरला

Mumbai

राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी बोर्डाच्या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांवर होत असलेली गुणांची खैरात यंदापासून बंद केली आहे. त्यामुळे निकालाचा टक्का घसरल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील भ्रमाचा भोपळा फुटला आहे. यंदा राज्याचा निकाल १२.३१ टक्क्यांनी खालवला असून तो ७७.१० टक्के इतका लागला आहे. १२ वर्षांतील सर्वात कमी निकाल यावर्षी नोंदवला गेला आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून शुक्रवारी जाहीर केलेल्या निकालात यंदा पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ८२.८२ टक्के तर मुलांचा निकाल ७२.१८ टक्के इतका लागला आहे.

खालावलेल्या निकालाचा थेट फटका आता अकरावी प्रवेशाला बसणार असून राज्य शिक्षण मंडळाच्या तुलनेत सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजांचा मार्ग सुकर होणार असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे निकालाचा टक्का घसरल्यामुळे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे, असे निकालाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यंदा नऊ विभागीय मंडळांपैकी एकाही मंडळाचा निकाल नव्वदीपार पोहचलेला नाही. दरम्यान, यंदा अभ्यासक्रम बदलांचा फटका निकालांना बसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले. तसेच तोंडी परीक्षेचे सरसकट गुण न मिळाल्याने हा निकालाचा टक्का घसरल्याचे यावेळी नमूद केले.

राज्य शिक्षण मंडळाकडून १ मार्च ते २२ मार्चदरम्यान घेतलेल्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून तब्बल १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ज्यात १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८३.०५ टक्के लागला. यंदा राज्याचा निकाल ७७.१० टक्के लागला असून विभागावार निकालात पुन्हा एकदा कोकणाने आपले नाव कोरले आहे. कोकण विभागाचा निकाल ८८.३८ टक्के इतका लागला, त्यापाठोपाठ कोल्हापूर विभागाचा निकाल ८६.५८ टक्के लागला आहे. तिसर्‍या स्थानकांवर पुणे विभागाला समाधान मानावे लागले असून पुण्याचा निकाल ८२.४८ टक्के लागला आहे. मुंबई विभागाच्या निकालात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, गतवर्षी चौथ्या स्थानावर असलेल्या मुंबई विभागाला यंदा पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. मुंबईचा निकाल ७७.०४ टक्के इतका लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १३.३७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. यंदा सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ६७.२७ टक्के इतका लागला आहे.

यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. राज्यातून ७ लाख ४७ हजार ७१५ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ६ लाख १९ हजार २५९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलींचा निकाल ८२.८२ टक्के इतका लागला आहे. गेल्यावर्षी मुलींचा निकाल ९१.९७ टक्के इतका लागला होता. मुलांच्या निकालात ही कमालीची घट झाली असून मुलांचा निकाल १५.०९ टक्क्यांनी खालावला आहे. मुलांचा निकाल ७२.१८ टक्के लागला. गेल्यावर्षी मुलांचा निकाल ८७.२७ टक्के लागला होता. विषय निहाय निकालावर नजर टाकली असता यंदा मंडळाकडून ७१ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी फक्त १९ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्यावर्षी हा आकडा ११ विषयांवर मर्यादित होता.