घरमुंबईखंडित वीजपुरवठ्याचा रुग्णसेवेवर तात्पुरता परिणाम

खंडित वीजपुरवठ्याचा रुग्णसेवेवर तात्पुरता परिणाम

Subscribe

मुंबईतील केईएम, नायर, सायन, जे.जे. हॉस्पिटल प्रशासनाकडून तातडीने पर्यायी व्यवस्था केल्याने फारसा परिणाम जाणवला नाही.

अचानक खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे सोमवारी रुग्णालयीन सेवेलाही तात्पुरता फटका बसला. वीज पुरवठा खंडित होताच मुंबईतील केईएम, नायर, सायन, जे.जे. हॉस्पिटल प्रशासनाकडून तातडीने पर्यायी व्यवस्था केल्याने फारसा परिणाम जाणवला नाही.

मुंबईमध्ये सकाळी १०.१५ च्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. त्यावेळी जे.जे. हॉस्पिटलमधील मुख्य ओपीडी, एक्सरे विभाग, सीटी-स्कॅन, एमआरआय, सोनाग्राफी विभागातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये अंधार झाल्याने रुग्णांना माघारी पाठवण्यात आले. परंतु रुग्णालय प्रशासनाकडून तातडीने जनरेटरची व्यवस्था केल्याने रुग्णसेवा पूर्ववत झाली. त्याचप्रमाणे केईम, सायन व नायर हॉस्पिटलमध्येही अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णसेवा ठप्प झाली होती. वीज खंडित झाल्याने सायन हॉस्पिटलमध्ये ६ पैकी ४ शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग विभागाच्या ८ पैकी ६ शस्त्रक्रिया, न्यूरोसर्जरी विभागाच्या दोन, नेत्र विभागाच्या दोन शस्त्रक्रिया आणि युरोलॉजी विभागाच्या ८ पैकी २ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

- Advertisement -

पालिका प्रशासनाने रुग्णालयांमधील पर्यायी व्यवस्था तातडीने सुरू केली. यामध्ये प्रमुख्याने सर्वच रुग्णालयांमध्ये डिझेल इंधनावर चालणारी जनरेटर सुरू करण्यात आली. महापालिकेच्या रुग्णालयांसह सर्व खाजगी कोविड रुग्णालयांमध्येही डिझेल साठा पुरेशा प्रमाणात असल्याची व जनित्रे सुरू असल्याची खातरजमा महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे सातत्याने करण्यात आली. त्यामुळे काही काळ वगळता रुग्णसेवेवर फारसा परिणाम जाणवला नाही. जनरेटर सुरू करण्यात आल्याने महत्त्वाच्या शस्त्रक्रियाही सुरळीतपणे पार पडल्या, अशी माहिती रुग्णालय प्रशासनांकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -