लाचेच्या गुन्ह्यात पोलीस अधिकार्‍यासह म्हाडा अधिकार्‍यांना अटक

mumbai
taking a bribe

लाचेच्या गुन्ह्यांत एका पोलीस अधिकार्‍यासह म्हाडाच्या दोन अधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या दोन्ही कारवाईने पोलीस आणि म्हाडा अधिकार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अटकेत

पहिल्या कारवाईत या अधिकार्‍यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग गणपत पिठे यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. यातील तक्रारदार सांताक्रुज परिसरात राहत असून व्यवसायाने इस्टेट एजंट म्हणून काम करतात. त्यांच्याविरुद्ध अलीकडेच वाकोला पोलिसांत एक मारामारीचा गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याचा तपास पांडुरंग पिठे यांच्याकडे होता. या गुन्ह्यात मदत करणे तसेच कारवाई न करण्यासाठी पांडुरंग पिठे यांनी त्यांच्याकडे वीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही लाच दिली नाहीतर त्यांच्यावर कारवाईची धमकी देण्यात आली होती. लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पांडुरंग पिठे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सोमवारी रात्री या अधिकार्‍यांनी वाकोला पोलीस ठाण्यात साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री उशिरा तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता घेताना पांडुरंग पिठे यांना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले.

म्हाडाचे दोन अधिकारी ताब्यात
या कारवाईपूर्वी म्हाडाच्या दोन अधिकार्‍यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. वरिष्ठ लिपिक कांचन चंद्रकांत घाटकर आणि मिळकत व्यवस्थापक विकास दीनानाथ पावसकर अशी या दोघांची नावे आहेत. यातील तक्रारदार महिला असून त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. त्यांनी म्हाडाचे एक घर खरेदी केले होते. या घरावर नाव बदलण्यासाठी त्यांनी म्हाडा कार्यालयात अर्ज केला होता. यावेळी कांचन घाटकर आणि विकास पावसकर यांनी त्यांच्याकडे साडेपाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यांनी पाच हजार रुपये देण्याचे मान्य करुन ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सोमवारी या दोन्ही अधिकार्‍यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. एकाच दिवशी एका पोलीस अधिकार्‍यासह म्हाडाच्या दोन अधिकार्‍यांना लाचेच्या गुन्ह्यात अटक झाल्याने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here