घरमुंबईरबराने केला घात; आग कमी, धूर जास्त

रबराने केला घात; आग कमी, धूर जास्त

Subscribe

६ ठार, ८ गंभीर, १६० जण जखमी

अंधेरीच्या कामगार विमा हॉस्पिटलच्या आगीला रबर शिट्स कारणीभूत ठरल्याची माहिती समोर येत आहे. तळ मजल्यावर लागलेल्या आगीच्या ठिकाणी रबर शिट्सचा साठा होता. मात्र, ही आग मोठी नव्हती, परंतु रबरामुळे धूर मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन वरच्या मजल्यापर्यंत पोहोचला. रबराच्या या रासायनिक धुरामुळेच पेशंट आणि नातेवाईक गुदमरले आणि धुरामुळे पुढचे काहीच दिसत नसल्याने त्यांना बाहेर पडता आले नसल्याने ६ जणांचा मृत्यू झाला, ८ जण गंभीर झाले असून १६० जण जखमी आहेत.

सोमवारी दुपारी लागलेली आग ही कामगार हॉस्पिटलच्या तळ मजल्यावरील एका खोलीत लागली होती. ज्या खोलीत ही आग लागली होती,त्यामध्ये रबर शिट्सचा साठा ठेवण्यात आला होता. या आगीमध्ये रबरही पेटला गेला. अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही आग मोठ्या तीव्रतेची नव्हती. आग मोठी नसली तरी रबराला लागलेल्या आगीमुळेच धूर पसरला होता. धूर हा नेहमी वरच्या दिशेने पसरत असल्याने तळ मजल्यावरील आगीचा धूर जिन्यावाटे वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचला. खरं म्हणजे पहिल्या, दुसर्‍या किंवा तिसर्‍या मजल्यावर ही आगच लागलेली नव्हती,असेही अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

रबरामुळे निर्माण झालेल्या रासायनिक धुराने आतमध्ये अडकलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच कर्मचारी वर्ग यांना बाहेर पडता येत नव्हते. धूर हा जिन्याच्या वाटेच पहिल्या आणि त्यानंतर वरील मजल्यांपर्यंत पोहोचल्याने इमारतीत अडकलेल्यांना बाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे जखमींची संख्या वाढली. आग पसरली असती तर मृतांची संख्या वाढली असती. परंतु या धुरात अडकलेल्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढून अन्य हॉस्पिटलात हलवल्याचे अग्निशमन दलाच्या सुत्रांनी स्पष्ट केले.

एनओसी नाकारण्यात आली

कोलकाता येथील हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर हॉस्पिटलात आग प्रतिबंधक उपाययोजना राबवणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे कामगार हॉस्पिटलचे नुतनीकरण केल्यानंतर यामध्ये आग प्रतिबंधक उपाय योजना कार्यान्वित नसल्याने अग्निशमन दलाच्यावतीने पंधरा दिवसांपूर्वीच एनओसी नाकारण्यात आली होती. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतरही एनओसी दिली जाईल, असे अग्निशमन दलाच्यावतीने कामगार हॉस्पिटलच्या अधिकार्‍यांना कळवले होते. परंतु सुदैवाने आग मोठी नसल्याने मोठी जीवितहानी होण्यापासून वाचली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -