घरमुंबईसमलिंगी संबंधातून वाद तरूणाचा हकनाक बळी

समलिंगी संबंधातून वाद तरूणाचा हकनाक बळी

Subscribe

समलिंगी संबंधातून झालेल्या वादात पार्थ मणिकांत रावल नावाच्या एका 25 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्न, जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी धवल प्रफुलभाई उनाडकर याला अटक केली आहे. रविवारी सकाळी वांद्रे परिसरात घडलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. मोहम्मद आसिफ हा तरुण वांद्रे येथील हिल रोडवरील वेटो निका स्ट्रिट, यास्मिन व्हिला परिसरात राहतो. धवल उनाडकर हा त्याचा मित्र असून तो बोरिवलीतील साईबाबा नगरात राहतो. धवल हा गे असून त्याने मोहम्मद आसिफसोबत समलिंगी संबंध ठेवण्याची विनंती केली होती.

मात्र त्याने तसे करण्यास नकार देत त्याला एचआयव्ही तपासणी करण्याचा सल्ला दिला होता. रविवारी सकाळी मोहम्मद आसिफचा दुबईहून आलेला मित्र पार्थ हा त्याच्याकडे आला होता. यावेळी घरात ते दोघेही एकत्र होते, याच दरम्यान तिथे धवल आला होता. या दोघांना घरात एकातांत पाहिल्यानंतर त्याने मोहम्मद आसिफशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. हा वाद सुरू असतानाच त्याने पार्थ याच्या डोक्यात लाकडी मेणबत्ती स्टॅण्डने हल्ला केला तसेच लॅपटॉपच्या वायरने त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत या दोघांनी त्याला लिलावती रुग्णालयात दाखल केले, तिथे त्यांनी पार्थ हा अपघातात जखमी झाल्याचे सांगून डॉक्टरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात अ‍ॅडमिट न करता प्राथमिक औषधोपचार करुन घर आणले.

- Advertisement -

मात्र घरी आणल्यानंतर पार्थची प्रकृती प्रचंड ढासळली होती. त्यामुळे त्याला या दोघांनी पुन्हा भाभा रुग्णालयात दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही माहिती रुग्णालयातून समजताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद आसिफची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असता त्याने पार्थची धवल उनाडकर यानेच मेणबत्तीच्या स्टॅण्डने मारहाण करुन तसेच लॅपटॉपच्या वायरने गळा आवळून हत्या केली. तसेच त्याने विरोध केला असता त्याला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याची गळा आवळून हत्येचा प्रयत्न केला होता. या जबानीनंतर पोलिसांनी धवलविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्न, जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच रविवारी रात्री उशिरा आरोपी धवल उनाडकर याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -