राजाबाई टॉवरला युनेस्कोचा अवार्ड

Mumbai

देशासह मुंबईला एक समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. एकट्या दक्षिण मुंबईमध्ये भारताचा हेरिटेज जिल्हा होण्याची क्षमता आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू आणि संस्कृतीने मुंबई नटलेली आहे मात्र यापैकी अनेक बाबी दुर्लक्षित आणि जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत असल्यामुळे आपल्याला लाभलेल्या या प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी विद्यापीठाने पुढे येऊन विद्यार्थ्यांना वारसा चळवळीत सहभागी करुन घ्यावे. विद्यापीठाच्या मार्फत शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या मदतीने ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना समृद्ध ऐतिहासिक वारसाची ओळख करुन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि विद्यापीठाचे कुलपती यांनी केले. युनिस्कोतर्फे घोषित करण्यात आलेल्या आशिया पॅसिफीक वार्ड फॉर कल्चरल हेरिटेज कंझर्वेशनचा बहुमान मुंबई विद्यापीठाला प्राप्त झाला. यानिमित्ताने विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर, इंडियन हरिटेज सोसायटीच्या अध्यक्षा अनिता गरवारे, युनिस्कोचे संचालक एरीक फाल्ट, टीसीएसचे एन.जी. सुब्रमनिअम, डॉ. ब्रिंदा सोमया, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईमध्ये जागतिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालय, एलिफंटा केव्हज, छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, डेविड ससून लायब्ररी आदी अनेक वास्तू आहेत. यासोबतच शासकीय निवासस्थाने, बंदरे, किल्ले, डॉक्स, एशियाटीक लायब्ररी, कस्टम हाऊस, बॅलॉर्ड इस्टेट, उच्च न्यायालयाच्या इमारती आदी अनेक वास्तू मुंबईच्या ऐतिहासिक संस्कृतीचे साक्षीदार आहेत. यापैकी अनेक इमारतींचे जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता आहे, तर काही वास्तूंची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्यामुळे या वास्तुंपैकी काही निवडक वास्तू विकसित करुन, मुंबई शहरामध्ये हेरिटेज टुरिजम सुरु करण्याची संकल्पना राज्यपाल यांनी व्यक्त केली.