घरमुंबईसामंत यांच्या त्या पत्रावरून ठाकरे सरकार बॅकफुटवर!

सामंत यांच्या त्या पत्रावरून ठाकरे सरकार बॅकफुटवर!

Subscribe

कुलपतींनी फटकारल्यानंतर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत हालचाली

मुंबई- राज्यात असलेल्या कोणाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता ग्रेडिंग देऊन विद्यार्थ्यांना पदवी देण्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे चारच दिवसांपूर्वीचे पत्र मागे घेण्याची नोबत राज्यातील महा विकास आघाडी सरकारवर ओढवली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाला यूजीसीला पाठवलेल्या पत्राबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली होती. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना ग्रेडिंग पद्धतीने थेट पदवी देण्याबाबतचे उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांचे ते पत्र मागे घेण्याबाबत विचार सुरू झाल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले.

चारच दिवसांपूर्वी राज्यात असलेल्या करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता ग्रेडिंग देऊन विद्यार्थ्यांना पदवी देण्यात यावी,असे पत्र राज्य शासनाकडून विद्यापीठ अनुदान आयोगास देण्यात आले होते. युवा सेना प्रमुख व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आग्रहामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या व अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता ग्रेडिंग पद्धतीने विद्यार्थ्यांना पदवी देण्याबाबतचे पत्र यूजीसी ला पाठवले होते. मात्र विद्यापीठ कायद्यानुसार अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना थेट पदवी देणे हे विद्यापीठ कायद्याच्या विसंगत आहे तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही ते उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे राज्यपाल व राज्यातील विद्यापीठांचे कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी त्या पत्राबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्यास आक्षेप घेतला होता. यामुळे राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात यामुळे नवा वाद उभा राहिला होता. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न यामुळे अधिक गंभीर बनला होता. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयाबाबत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली होती .

- Advertisement -

अखेरीस यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील संकटमोचक म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली आणि या भेटीनंतर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत राज्यपाल जो निर्णय घेतील त्याचे सरकार पालन करेल असे सांगितले. त्यामुळे उदय सामंत यांचे परीक्षा न घेण्याबाबतचे ते पत्र राज्य सरकारला मागे घ्यावे लागणार आहे. येत्या एक-दोन दिवसात राज्य सरकार राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -