घरमुंबईवाडिया हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही!

वाडिया हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही!

Subscribe

परळमधील वाडिया हॉस्पिटल बंद करण्याचा घाट घालण्यात आल्याने पगाराअभावी हवालदिल झालेल्या कामगारांनी आपल्या न्यायहक्कासाठी तसेच रुग्णालयाचे थकीत अनुदान मिळण्यासाठी सोमवारी वाडिया हॉस्पिटलसमोर जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे तसेच भाजपनेही पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, वाडिया हॉस्पिटलमधील काही डॉक्टर प्रसूती आणि बाल रुग्णालय या दोन्ही ठिकाणी वेतन आणि मानधन तसेच निवृत्ती वेतन घेत असल्याचे सांगत महापालिकेने नोव्हेंंबरपर्यंतची सर्व थकीत रक्कम दिल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे केवळ २० ते २१ कोटी रुपयांचीच थकीत रक्कम असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनासोबत मंगळवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून पुढील कार्यवाही केली जाईल,असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

परळमधील नवरोजी वाडिया प्रसुती हॉस्पिटल आणि बाई जेरबाई वाडिया बाल हॉस्पिटल अशा दोन हॉस्पिटलांचे थकीत अनुदान शासन तसेच महापालिकेकडून न मिळाल्याने रुग्णालय पुढे चालवणे परवडणारे नाही. त्यामुळे नवीन रुग्णांना दाखल करून न घेता हे हॉस्पिटल बंद करण्यासंदर्भात रुग्णालय व्यवस्थापनाने नोटीस जारी केली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे रुग्णालय बंद होऊ नये व विविध मागण्यांसाठी वाडिया हॉस्पिटलमधील कर्मचारी व लाल बावटा जनरल कामगार युनियन अनेक मागण्यांसाठी लाल बावटा कामगार युनियनचे अध्यक्ष मधुकर परब व जनरल सेक्रेटरी प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन करण्यात आले. महापालिका व राज्य शासनान अनुदान दिलेले नाही, हे कारण सांगून वाडिया व्यवस्थापनाने कर्मचार्‍यांना वेतन दिले नाही, तसेच निवृत्ती (रिटायर) कामगारांचे पेन्शन बंद केले आहेत. या कृत्याला युनियनने तीव्र विरोध केला असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या बाबतीत त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

वाडिया हॉस्पिटल बंद होणार नाही-शर्मिला ठाकरे
या आंदोलनाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पत्नी शर्मिला ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी, वाडिया बंद होणार नाही. कर्मचार्‍यांपेक्षा इथे येणारे रूग्ण जास्त महत्त्वाचे असल्याचे सांगितले. माझ्याकडे एक बाई आल्या होत्या. त्यांचे मुल वाडियात अ‍ॅडमीट होते आणि ते गेले. तेव्हापासून गेले १५ दिवस आम्ही या गोष्टीचा पाठपुरवठा करत आहोत. सीईओ ना भेटलो, महापालिकेच्या लेखा विभागाचे प्रमुख अधिकारी पडवळ यांना भेटलो. पण काहीच मार्ग न निघाल्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आता लवकरात लवकर अजित पवारांना भेटणार आहोत आणि वाडियासाठी अनुदान लवकरात लवकर द्या अशी मागणी करणार असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.

व्यवस्थापनाकडून नियमांचे उल्लंघन -काकाणी
वाडियासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षेतखाली गटनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सन २०१०च्या शासन निर्णयानुसार औषधोपचार व वेतन यावरील खर्च हा महापालिका आणि राज्य शासनाने विभागून देण्यात येत आहे. त्यामुळे एकूण खर्चाच्या ८५ टक्केपेक्षा अधिकचा खर्च द्यावा, त्यानुसार महापालिकेचा हिस्सा हा बाल रुग्णालयासाठी १०० टक्के व व प्रसुतीगृहासाठी ५० टक्के एवढी रक्कम दिली जाते. दर तीन महिन्याने ही रक्कम अदा केली जाते. ती रक्कम अदा करताना, गतवर्षीचा ताळेबंद सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) सुत्रानुसार नोकर भरती करणे आवश्यक होते. परंतु झाले नाही. एमसीआयपेक्षा जास्त आहे. ज्याअर्थी महापालिका व शासन खर्चाचा भार वाहते, त्याअर्थी महापालिका नियम पाळणे आवश्यक आहे. पण त्यांचेही पालन झालेले नाही.

- Advertisement -

गरीबांनाही मोफत उपचार नाही
गिरणी कामगारांसाठी ही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. पण आज गिरणी कामगार नसल्याने गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणे बंधनकारक आहे. परंतु मोफत सेवा नगण्यच आहे. कुणावर मोफत उपचार केला याची माहिती व्यवस्थापन देवूच शकली नाही. त्यामुळे ज्या हेतूने हॉस्पिटल सुरु करण्यात आले, त्या हेतूप्रमाणे काम झालेले नाही. उलट त्यांनी ठरवल्यानुसार अतिरिक्त शुल्क रुग्णांकडून घेवून उपचार दिले जातात, असे काकाणी यांनी सांगितले. तसेच काही कर्मचारी यांनी वेतन किंवा मानधन घेणे आवश्यक असते. पण एकच व्यक्ती वेतन व मानधन घेते. त्यानुसार ६ व्यक्ती वेतन व मानधनाचा लाभ घेत असतात. यासोबतच चौकशीत दहा व्यक्ती निवृत्ती वेतनाचा लाभ दोन्ही ठिकाणी अर्थात प्रसुतीगृह व बाल हॉस्पिटल घेत असतात,असे आढळून आल्याचे काकाणी यांनी सांगितले.

हॉस्पिटल बंद करण्याचा छुपा डाव-आशिष शेलार
वर्षानुवर्षे महापालिकेने आणि ट्रस्टने काहीही केलेले नाही. आता नायगावमध्ये दुसरी जागा हवी आहे म्हणून हा डाव रचला जात आहे. मुंबई महापालिकेतले सत्ताधारी आणि वाडिया यांचा हा छुपा डाव आहे. त्यांच्यामुळेच हॉस्पिटल बंद पाडण्याची वेळ आली आहे. आम्ही हे हॉस्पिटल बंद पडू देणार नाही. याविरोधात जनआंदोलन सुरू करणार आहोत. आजपासून आंदोलन सुरू होईल. हा सगळा नुरा कुस्तींचा डाव असल्याचा आरोप भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.

हे कर्मचारी घेतात दोन्ही वेतन आणि मानधन
मिनी बोधनवाला (मुख्य कार्यकारी अधिकारी)
लेनी वर्गीस, (वरिष्ठ प्रकल्प अधिकारी )
दिलीप शहा,
विश्वनाथ गायकवाड, (लेखाधिकारी)
सुहास पवार (मेडिकल सुपरिटेडंट)
निरंजन गायकवाड (प्रोटोकॉल अधिकारी)

पेन्शनचा लाभ दोन्ही ठिकाणी
नवरोजी वाडिया प्रसुती रुग्णालय आणि बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयांमध्ये १० कर्मचारी अधिकारी पेन्शनचा लाभ दोन्ही ठिकाणी घेतात. शासकीय सेवेत एखादे पद निभावताना अतिरिक्त कामांचा मोबदला हा पाच टक्के ते १५०० हजारांपर्यंत एवढी रक्कम देणे आवश्यक असते. परंतु पगार आणि मानधनापेक्षाही अधिक रक्कम दिल्याचे दिसून आल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

दुहेरी लाभ घेणार्‍यांवर होणारा मासिक खर्च
मानधन व वेतनाची रक्कम = १ लाख ६१ हजार ९४२ रुपये
पेन्शन व मानधनाची रक्कम : १ लाख ७० हजार १२ रुपये

नवरोजी वाडिया प्रसुती रुग्णालय
प्रारंभीच्या खाटा : १२० खाटा
वाढवलेल्या खाटांची संख्या : ३०० खाटा

आणि बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयांमध्ये
प्रारंभीच्या खाटा : १२० खाटा
वाढवलेल्या खाटांची संख्या : ३०७ खाटा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -