घरमुंबई...तर ठाणेकरांवरील पाणी संकट गहिरे

…तर ठाणेकरांवरील पाणी संकट गहिरे

Subscribe

कडक उन्हाळ्याने यंदा ठाणेकरांना प्रचंड घाम फुटला आहे. त्यातच पाणीटंचाईचे भीषण संकटाने तोंडचे पाणीही पळाले आहे. यंदा दीर्घ कालावधीत सरासरीच्या केवळ 93 टक्केच पाऊस पडणार असल्याचे मत स्कायमेट या खाजगी वेधशाळेने वर्तवले आहे. ठाणे शहरात एमआयडीसी, स्टेम आणि ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठ्याची योजना या तीन स्त्रोताद्वारे होणार्‍या पाणीपुरवठ्यात सध्या 17 ते 20 टक्के पाणीकपात सुरू आहे. आठवड्याला एमआयडीसीची 30 तास, स्टेमची आणि ठामपाच्या स्वत:च्या योजनेची प्रत्येकी 24 तासांची पाणीकपात सुरू आहे. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सात ते आठ तास कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सध्या ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे.पावसाळा सुरू होईपर्यंत हे नियोजन असून, जर पावसाळा लांबला आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला तर मात्र ठाणेकरांना अधिकच पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे.

ठाणे पालिकेला स्वतःचे धरण नाही. परिणामी वेगवेगळ्या आस्थापनांकडून आणि मुंबई पालिकेकडून मिळणार्‍या पाण्याचे नियोजन करूनच ठाणेकरांना पाणीपुरवठा करावा लागत आहे. मागील वर्षी अपेक्षेपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासूनच तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यातच ठामपाच्या पाणीपुरवठामध्ये विषमता असल्यामुळे काही विभागात संपूर्ण टंचाई तर काही विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. काही गृहसंकुलांमध्ये तर ठामपाकडून पुरवण्यात येणार्‍या पाण्याचा वापर सर्रासपणे गाड्या धुण्यासाठी केला जातो. साधारणपणे प्रत्येक घराला 130 ते 140 लिटर पाणीपुरवठा रोज मिळणे आवश्यक आहे. मात्र, ठाण्यात अनेक घरांमध्ये यापेक्षा जास्त पाणीपुरवठा होत आहे. पाण्यावर बंधन आणण्यासाठी व्यापारी तत्वांवर होणारा पाणीपुरवठा नियंत्रित करण्याबरोबरच पाण्याची गळती थांबवण्यासाठी ही प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत ठाणेकरांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

सध्या ठाणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा कमी आहे. भातसा धरणामध्ये सध्या 407.50 द.ल.घ.मी. पाणीसाठा असून गेल्यावर्षी याच काळात 474.11 द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध होता. बारवी धरणात 99.99 द.ल.घ.मी. पाणीसाठा असून गतवर्षी याच काळात 120.39 द.ल.घ.मी.पाणीसाठा होता. धामणीमध्ये सध्या 113.25 द.ल.घ.मी.164.91 द.ल.घ.मी., अप्पर वैतरणामध्ये सध्या 146.54 (128.84द.ल.घ.मी. तर आंध्रामध्ये सध्या 143.50 द.ल.घ.मी. तर गतवर्षी याच काळात 172.90 द.ल.घ.मी. पाणीसाठा होता. सिंचन विभागाकडून मिळालेल्या या आकडेवारीवरुन मागीलवर्षापेक्षा कमी पाणीसाठा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -