महाराष्ट्रातील वातावरण गढूळ; राष्ट्रपती राजवट लागू करा – रामदास आठवले

Will try to give Y plus security to Madan Sharma says Ramdas athawale

शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर आता राज्यात राजकारणाला सुरुवात झाली आहे. या मुद्द्यावरुन विरोधक शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या आंदोलनानंतर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील वातावरण गढूळ झालं असून महाविकास आघाडी सरकार बर्खास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केली.

रामदास आठवले यांनी आज मदन शर्मा यांच्या कांदिवली येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. मदन शर्मा यांच्यावर झालेला हल्ला हा जीवघेणा हल्ला होता. त्या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी कलम ३०७, ३२६ अन्वये गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. मात्र, या कलमाखाली गुन्हा दाखल न केल्यामुळे हल्लेखोरांना त्वरित जामीन मिळाला, असं आठवले यांनी म्हटलं. कंगना राणावतलाही अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्यात वातावरण गढूळ झाले आहे. सूडबुद्धीने वागणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला बरखास्त केले पाहिजे अशी मागणी पुढे आली आहे. हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीला माझा पाठिंबा असून त्यासाठी आपण केंद्रात प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र शेअर केल्यामुळे शिवसैनिकांनी नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. हा मुद्दा घेऊन विरोधकांनी राज्य सरकारवर आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मारहाणीत जखमी झालेले मदन शर्मा यांनी तर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी “महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्यांची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारित केलेले छायाचित्र बदनामीकारक असले तरी त्यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती,” असं स्पष्टीकरण दिलं. यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडन, ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलिसांवर हल्ला, आता निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांना मारहाण, पक्षाची भूमिका काय? तर म्हणे, संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, पण, इथे कायद्याचे राज्य आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे? असं ट्विट करत त्यांनी शिवसेनाला टोला लगावला आहे.


हेही वाचा – बाळासाहेबांनंतर फायरब्रँड एकच…राज ठाकरे