घरमुंबईखासदारविरुद्ध जिल्हा परिषद उपाध्यक्ष संघर्ष

खासदारविरुद्ध जिल्हा परिषद उपाध्यक्ष संघर्ष

Subscribe

शिवसेना आणि राष्ट्रवादीत खडाखडी

कमी दराने टेंडर मिळवून पालघर जिल्ह्यात रस्ते बनवणार्‍या जिजाऊ कंस्ट्रक्शनचा दर्जा तपासण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत त्या कामांचे ऑडिट करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीत यांनी केली आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष निलेश सांबरे आणि खासदार गावीत यांच्यात वाद सुुरु झाला आहे.

जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी पालघर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मालकीची आहे. भाजप सरकारच्या काळात सांबरे यांचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन यांच्याशी घनिष्ट संंबंध होते. तर सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. सांबरे पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडी तयार झाली आहे. यात शिवसेनेला पहिली अडीच वर्षे अध्यक्षपद मिळाले आहे. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला उपाध्यक्षपद आले आहे. राष्ट्रवादीने सांबरे यांनी ही संधी दिली आहे.

- Advertisement -

सांबरे यांच्या जिजाऊ कंन्स्ट्रक्शन कंपनीकडून जिल्ह्यात रस्त्यांची कामे केली जातात. 20 टक्के कमी दराने टेंडर ही कंपनी मिळवत आहे. त्यामुळे कामांचा दर्जा राखला जात नसल्याची खासदार गावीत यांची तक्रार आहे. त्यासाठी या कंपनीने कमी दराने घेतलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कामाचा दर्जा राखला जात नसल्यास तो सरकारी निधीचा अपहार आहे. यात जो कोणी ठेेकेदार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण कायदा सगळ्यांना समान असल्याने समान न्यायानुसारच काम झाले पाहिजे, असे खासदार गावीत यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी मात्र खासदार गावितांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खासदार गावीत त्रास देण्यासाठी जिजाऊच्या कामांची जाणीवपूर्वक तक्रार करीत असल्याचा पलटवार सांबरे यांनी केला आहे. जिल्ह्यात आमची यंत्रणा आहे. त्यामुळे कमी दराने काम परवडते. आम्ही कामांचा दर्जाही राखतो, असेही सांबरे यांचे म्हणणे आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी जिल्हा परिषदेत सत्तेवर येऊन अवघे काही दिवस उलटले असतानाच हा वाद सुरु झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, खासदार गावितांच्या आरोपांमुळे जिल्ह्यातील इतर बडे ठेकेदारही सुखावले आहेत. सांबरे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाल्याने सत्ताधारी बनलेले सांबरे जिल्ह्यात कामे करू देतील की नाही याची धास्ती या ठेकेदारांना आधीपासूनच होती. त्यात खासदारांनी थेट आरोप केल्याने सांबरे यांचा ठेक्यांमधील हस्तक्षेपाला लगाम बसेल, अशी आपेक्षा बाळगली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -