इंग्लंडमधील अपयशानंतर विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघात बदल

Mumbai

इंग्लंडमध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच प्रत्येक संघाला आधी जाहीर केलेल्या प्राथमिक संघात आयसीसीची परवानगी न घेता २३ मे पर्यंत बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. आता, इंग्लंडमधील एकदिवसीय मालिका ०-४ अशी गमावल्यानंतर पाकिस्तानने आपल्या प्राथमिक संघात तीन बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर,वहाब रियाझ आणि फलंदाज आसिफ अली यांचा संघात समावेश करण्यात आला आहे, तर जुनेद खान, फहीम अश्रफ आणि अबिद अली यांना संघातील स्थान गमवावे लागले आहे.

पाकिस्तनाने काही दिवसांपूर्वी प्राथमिक संघाची घोषणा केल्यानंतर विश्वचषकाआधी सराव मिळावा यासाठी हा संघ इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळला. या मालिकेत पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले, पण त्यांच्या गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. या मालिकेच्या ५ पैकी ४ सामन्यांत इंग्लंडने ३४० पेक्षा अधिक धावसंख्या उभारली. त्यामुळे पाकिस्तानने मोहम्मद आमिर आणि वहाब रियाझ या डावखुर्‍या वेगवान गोलंदाजांना विश्वचषकाच्या संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. फलंदाज आसिफ अलीला विश्वचषकासाठीच्या प्राथमिक संघात स्थान मिळाले नव्हते, पण त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली होती. या संधीचा चांगला उपयोग करत त्याने ४ डावात २ अर्धशतके झळकावत विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here