बंगळुरू एफसीचा मुंबईकर हिरा

Mumbai
राहुल भेके

बंगळुरू फुटबॉल क्लब आणि गोवा एफसी यांच्यातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) या फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना. ९० मिनिटांत दोन्ही संघांना गोल न करता आल्याने सामना अतिरिक्त वेळेत त्यातही गोल न होण्याची चिन्हे. मात्र, वेळ संपायच्या ३ मिनटे आधी राहुल भेके या मुंबईकर खेळाडूने अप्रतिम हेडर मारत या सामन्यातील एकमेव गोल करत बंगळुरू एफसीला पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले. बचावफळीत प्रामुख्याने राईट बॅक या जागेवर खेळणार्‍या राहुलच्याच २ चुकांमुळे मागील वर्षीच्या अंतिम सामन्यात बंगळुरूला पराभवाला सामोरे जावे लागले होते, पण या चुकांमधून शिकून त्याने यावर्षी आपल्या संघाला आयएसएलची ट्रॉफी मिळवून दिली. राहुलच्या कारकिर्दीचा प्रवास हा या दोन अंतिम सामन्यांप्रमाणेच आहे. खूप चढ-उतारांनी भरलेला.

मुंबईच्या अनेक युवकांप्रमाणेच राहुल भेकेनेही शाळेपासून खेळण्याला सुरुवात केली. त्यानंतर त्याची महिंद्रा युनायटेड या जुन्या आणि नावाजलेल्या फुटबॉल क्लबच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली. राहुलने विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे २०११ साली आय-लीगमधील संघ एअर इंडियाने व्यावसायिक करार केला. मात्र, त्याला मुख्य संघात खेळण्यासाठी वाट पहावी लागली. ती संधी त्याला मिळाली २०१२-१३ च्या मोसमात. एअर इंडियाने काही कारणांनी हा संघ पुढे सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुलने २०१४ मध्ये मुंबई एफसीशी करार केला. त्याला २०१३-१४ च्या मोसमात अवघे ६ सामने खेळण्याची संधी मिळाली, पण मर्यादित संधीमध्येही त्याने चांगला खेळ केल्याने मुंबईने त्याला २०१४-१५ मोसमासाठीही करारबद्ध केले. त्याने याच मोसमात बंगळुरूविरुद्ध व्यावसायिक फुटबॉलमधील आपला पहिला गोल केला. मुंबईकडून दोन मोसम खेळल्यानंतर त्याने ईस्ट बंगाल या फुटबॉल क्लबशी करार केला. त्याने पहिल्याच मोसमात कट्टर प्रतिस्पर्धी मोहन बागानविरुद्ध गोल केला.

याचदरम्यान इंडियन सुपर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली. २०१५ च्या मोसमासाठी स्थानिक खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये राहुलचा समावेश होता. मात्र, त्याला कोणत्याही संघाने आपला भाग बनवले नाही. आयएसएलचा हा मोसम सुरू होण्याआधी झालेल्या शिबिरात केरला ब्लास्टर्स संघाने त्याला संधी दिली. त्याने मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करत केरलाला आपल्या संघात घेण्यासाठी भाग पाडले. त्याने केरलाकडून पहिल्या मोसमात १२ सामने खेळले. त्यानंतर पुढील वर्षी तो पुणे सिटीकडून आयएसएलमध्ये खेळला. या दोन्ही संघांनी त्याला ईस्ट बंगालकडून लोनवर (ठरावीक काळासाठी आपल्या संघात) घेतले होते. मात्र, मागील आयएसएल मोसमाआधी राहुलला बंगळुरू एफसीने करारबद्ध केले.

बंगळुरूकडून खेळायला लागल्यापासून त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याला चाहत्यांचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला, पण तरीही भारताचे माजी प्रशिक्षक स्टेफन कॉन्स्टँटिन यांनी याचवर्षी जानेवारीमध्ये झालेल्या आशियाई करंडकाच्या संभाव्य ३४ खेळाडूंच्या यादीतही त्याला स्थान दिले नाही. भारतीय संघात स्थान मिळाले नाही याचे त्याला नक्कीच दुःख झाले असेल. मात्र, याचा परिणाम त्याने आपल्या खेळावर होऊ दिला नाही. त्याने बंगळुरूसाठी चांगली कामगिरी सुरू ठेवली. बंगळुरूचे प्रशिक्षक कुद्रात यांनीही त्याला खूप प्रोत्साहन आणि हवे तसे खेळण्याची मोकळीक दिली. त्यामुळे त्याच्या खेळात खूप सुधारणा झाली आणि त्याने या मोसमात आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात गोल करत त्याने मोसमाचा शेवटही गोड केला. यापुढेही त्याने आपले दमदार प्रदर्शन सुरू ठेवले, तर भारताकडून खेळण्यासाठी त्याला फारकाळ वाट पहावी लागणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here