घरक्रीडाक्रिकेट लव्हली क्रिकेट!

क्रिकेट लव्हली क्रिकेट!

Subscribe

क्रिकेटचे बायबल अशी विस्डेनची महती! दीडशेहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या विस्डेनचे १९६३ हे शताब्दी वर्ष. त्या शताब्दी निमित्ताने इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला विस्डेन ट्रॉफी देऊन गौरवण्याची प्रथा पडली. करोनामुळे तीन-चार महिने सारे क्रीडाजगत थंडावले होते आणि याला क्रिकेटचाही अपवाद नव्हता. परंतु, आता इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात जुलैमध्ये होणार्‍या विस्डेन ट्रॉफीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात होणार आहे.

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला जुलै महिन्यात सुरुवात होणार आहे. करोनामुळे गेले तीन-चार महिने सारे क्रीडाजगत थंडावले होते आणि याला क्रिकेटचाही अपवाद नव्हता. वेस्ट इंडिज-इंग्लंड या दोन देशातील क्रिकेटचा इतिहास मनोरंजक आहे. १९६३ पासून या दोन संघांमध्ये विस्डेन ट्रॉफीसाठी मालिका खेळण्यात येत आहे. गेल्या दोन दशकात इंग्लंडचे वर्चस्व दिसून येत आहे, पण ८० च्या दशकात वेस्ट इंडिजचाच वरचष्मा असायचा. लॉईडच्या संघाने गावरच्या इंग्लंडला १९८४-८५ मध्ये लागोपाठ दोनदा ५-० असा व्हाईटवॉश दिला होता. तीनदा तर डावाने मारा खाण्याची आफत इंग्लंडवर ओढवली होती.

क्रिकेटचे बायबल अशी विस्डेनची महती! दीडशेहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या विस्डेनचे १९६३ हे शताब्दी वर्ष. त्या शताब्दी निमित्ताने इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिका विजेत्या संघाला विस्डेन ट्रॉफी देऊन गौरवण्याची प्रथा पडली. इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकांना सुरुवात झाली १९३० मध्ये! पहिली दोन दशके इंग्लंडचे वर्चस्व असायचे. विक्स, वॉलकॉट, वॉरेल या तीन डब्ल्यूजच्या आगमनानंतर, तसेच सोनी रामधीन, आल्फ वॅलेंटाईन या फिरकी जोडगोळीमुळे वेस्ट इंडिजने बाजी मारली. त्यात भर पडली ती गॅरी सोबर्ससारख्या चतुरस्त्र खेळाडूची अन् मग इंग्लंडच्या वर्चस्वाला शह बसू लागला. वॉरेलसारखा सभ्य-सुशील कर्णधार लाभल्यावर सोबर्स, हंट, कन्हाय, बुचर, हॉल, ग्रिफिथ, गिब्स यांच्या साथीने त्याने चांगल्या संघाची उभारणी केली.

- Advertisement -

वॉरेलकडून सोबर्सकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आल्यावर वेस्ट इंडिजचा दबदबा वाढला. १९६६ च्या मालिकेवर सर्वस्वी गॅरी सोबर्सची छाप होती. तीन शतकांसह ७२२ धावा, २० बळी, शिवाय १० अप्रतिम झेल आणि कर्णधार म्हणून मालिकेत ३-१ अशी सरशी! क्रिकेट जगतातील सार्वकालिक महान अष्टपैलू खेळाडू असे बिरुद सोबर्सला लाभले. नेव्हिल कार्डससारख्या नामवंत समीक्षकाने सोबर्सवर स्तुतीसुमने उधळली. याच सोबर्सला अजित वाडेकरच्या भारतीय संघाने १९७१ च्या मोसमात विंडीजमध्ये १-० असे हरवून मालिका जिंकली अन् सोबर्सला कर्णधारपद सोडावे लागले. त्याआधी त्याने वादग्रस्त र्‍होडेशियाचा (आताचा झिम्बाब्वे) दौरा केल्यामुळे सोबर्सबाबत विंडीजमध्ये नाराजी होतीच. रोहन बाबुलाल कन्हायकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आणि त्याने १९७३ च्या दौर्‍यात इंग्लंडला त्यांच्याच देशात २-० असे नमवून विस्डेन ट्रॉफी पटकावली.

सोबर्सने क्रिकेटला अलविदा केल्यावर क्लाईव्ह हुबर्ट लॉईडकडे विंडीज संघाची धुरा सोपवण्यात आली ती १९७४-७५ च्या मोसमात. लॉईड युग अवतरले आणि विंडीज क्रिकेटला चार चांद लागले. १९७५ चा पहिलावहिला वर्ल्डकप विंडीजनेच पटकावला. १९७६ इंग्लंड दौरा सुरु होण्याआधी इंग्लंड कर्णधार टोनी ग्रेगने दर्पोक्ती केली की विंडीजला आम्ही (इंग्लंड संघ) लोटांगण घालायला लावू! बस मालिकाआधीच ठिणगी पडली आणि व्हीव रिचर्ड्ससह लॉईडचे सर्व शिलेदार पेटून उठले. त्यांनी इंग्लंडला ३-० असे खडे चारले. रिचर्ड्सने २३२, १३५, २९१ अशा शतकांच्या माळ लावत मालिकेत ८९१ धावा चोपून काढल्या आणि ग्रेगची बोलती बंद केली. मायकल होल्डिंगने ओव्हल कसोटीत इंग्लंडला चांगलेच शेकवून काढत १४ मोहरे टिपले. ग्रेगची तर दातखीळच बसली. विंडीज तोफखाना म्हणजे अँडी रॉबर्ट्स, मायकल होल्डिंग, जोएल गार्नर (बिग बर्ड), कॉलीस किंग! यांच्यानंतर माल्कम मार्शल, कर्टली अँब्रोज, कोर्टनी वॉल्श प्रभुतींनी इंग्लंडसहित सर्वच प्रतिस्पर्धी संघाना आपल्या शरीरवेधी, भेदक आक्रमणाची जरब बसवली.

- Advertisement -

ब्रायन चार्ल्स लारा नावाचे वादळ क्रिकेट जगतात अवतरले. त्रिनिदादच्या या शैलीदार डावखुर्‍या फलंदाजाला इंग्लिश गोलंदाजीची चटक लागली आणि त्याने विस्डेन ट्रॉफी मालिकेत आपला ठसा उमटवताना ३७५, ४०० अशा धावांच्या राशी उभारल्या. बार्बाडोसचा सोबर्स, अँटिगाचा रिचर्ड्स आणि त्रिनिदादचा लारा या त्रिकुटाने क्रिकेट जगतात आपल्याबरोबर विंडीज क्रिकेटचे नावही रोशन केले. २००० नंतर मात्र वेस्ट इंडिज क्रिकेटला उतरती कळा लागली आणि इंग्लंडचा वरचष्मा जाणवू लागला. अँडरसन, ब्रॉड तेज जोडगोळीचा यशस्वी आणि भेदक मारा, कूक प्रभुतींची चमक यामुळे गेल्या दोन दशकात इंग्लंडचा संघ बलवान वाटतोय.

आता जगभरात टी-२० क्रिकेटचे अवाढव्य जाळे पसरत चालले आहे. आयपीएल, बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग, पाकिस्तान तसेच बांगलादेशमधील टी-२० स्पर्धांमध्ये पैसा झटपट आणि मुबलक प्रमाणात मिळतो. त्यामुळे विंडीजचे बरेचसे खेळाडू टी-२० क्रिकेटकडे वळत आहेत. तसेच होतकरू खेळाडू क्रिकेटऐवजी दुसर्‍या खेळाला प्राधान्य देताहेत. परिणामी विंडीजला दर्जेदार खेळाडूंची चणचण जाणवते. वेस्ट इंडिजमधील युवकांना बास्केटबॉलचे आकर्षण वाटत आहे, जिथे पैसा झटपट आणि रग्गड मिळतो.

वेस्ट इंडिजने गतवर्षी मायदेशातील मालिका २-१ अशी जिंकली. त्यामुळे विस्डेन ट्रॉफी त्यांच्याकडे आहे. ती राखण्यासाठी त्यांना इंग्लंडमध्ये जीवतोड मेहनत करावी लागेल. यंदा दौरा सुरु होण्याआधीच डॅरेन ब्रावो, शिमरॉन हेटमेयर, किमो पॉल यांनी माघार घेतली. पॉल गोलंदाज असून ब्रावो आणि हेटमेयर या फलंदाजांची उणीव विंडीजला प्रकर्षाने जाणवेल. तीन वर्षांपूर्वी इंग्लंड दौर्‍यात हेडिंग्ली कसोटीत शाई होपने दोन्ही डावात शतके झळकावण्याचा पराक्रम केला. विस्डेन ट्रॉफी मालिकेत अशी कामगिरी करणारा गॉर्डन ग्रीनिजनंतर केवळ दुसरा वेस्ट इंडियन फलंदाज! त्याआधी जॉर्ज हेडली यांनी दोनदा इंग्लंडविरुद्ध असा पराक्रम केला होता. होपकडून विंडीजला मोठ्या अपेक्षा आहेत. फलंदाजीत रॉस्टन चेस त्याला कशी साथ देतो ते आता बघायचे.

कर्णधार जेसन होल्डर, किमार रोच, अल्झारी जोसेफ या तेज त्रिकुटाला इंग्लिश हवामानाची साथ लाभल्यास जो रूटचा संघ अडचणीत येऊ शकतो. गेल्या दौर्‍यातील लीड्स कसोटी विजयात होपच्या शतकी कामगिरीचे मोल वाया जाणार नाही याची खबरदारी रोच आणि शॅनन गेब्रियल या तेज जोडीने घेतली होती. यंदा विंडीजची फलंदाजी कमकुवत वाटतेय. परंतु, विंडीज इंग्लंडला झुंज देईल अशी आशा चाहते करत आहेत. चार महिन्यांनंतर पुन्हा सुरु होणार्‍या कसोटी मालिकेची उत्सुकता राहुल द्रविडप्रमाणेच लक्षावधी क्रिकेट चाहत्यांना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -