घरक्रीडाडेव्हिडि बेकहॅम म्हणतो, 'रोनाल्डोपेक्षा मेस्सी भारी'

डेव्हिडि बेकहॅम म्हणतो, ‘रोनाल्डोपेक्षा मेस्सी भारी’

Subscribe

बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी आणि ज्युव्हेंटसचा क्रिस्तिआनो रोनाल्डो यांची फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना होते. या दोघांत सरस कोण याबाबत मागील १०-१५ वर्षांत सतत चर्चा सुरु असते. फुटबॉलमधील सर्वात मानाचा वैयक्तिक पुरस्कार ‘बॅलन डी ओर’ मेस्सीने विक्रमी सहावेळा, तर रोनाल्डोने पाचवेळा जिंकला आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाची निवड करणे नेहमीच अवघड असते. मात्र, इंग्लंडचा माजी कर्णधार डेविड बेकहॅमने मेस्सीला पसंती दिली आहे.

मेस्सीचा दर्जाच वेगळा

“मेस्सीचा दर्जा सर्वांपेक्षा वेगळाच आहे. त्याच्यासारखा दुसरा खेळाडू असणे शक्यच नाही. मेस्सीच्या तुलनेत क्रिस्तिआनो रोनाल्डोचा दर्जा थोडा खालचा आहे. मात्र, या दोघांचा स्तर इतरांपेक्षा फार वेगळा आहे. इतर खेळाडूंची त्यांच्याशी तुलना होऊच शकत नाही”, असे बेकहॅम म्हणाला. मँचेस्टर युनायटेड या इंग्लंडमधील लोकप्रिय संघाच्या इतिहासात ७ क्रमांकाच्या जर्सीला फार महत्त्व आहे. बेकहॅमनंतर युनायटेडसाठी ७ क्रमांकाची जर्सी रोनाल्डोने परिधान केली. तसेच बेकहॅमने स्पेनमधील रियाल माद्रिद संघ सोडल्यानंतर दोन वर्षांनी रोनाल्डो या संघात दाखल झाला.

- Advertisement -

मेस्सीने सामना फिरवला

बेकहॅमने मेस्सीची एक आठवणही सांगितली. २०१३ साली चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत बेकहॅमचा पॅरिस संघ आणि मेस्सीचा बार्सिलोना संघ आमनेसामने आले. बार्सिलोनाच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दुखापतीमुळे मेस्सी सुरुवातीपासून खेळू शकला नव्हता आणि याचा फायदा घेत पॅरिसने आघाडी मिळवली होती. मात्र, उत्तरार्धात मेस्सी मैदानावर आला आणि त्याने सामन्याचे पारडे बार्सिलोनाच्या बाजूने झुकवले. “आम्ही सामन्यात आघाडी मिळवली होती. मात्र, मेस्सी मैदानात उतरला आणि बार्सिलोनाने गोल केला. त्यामुळे त्यांनी पुढील फेरी गाठली”, असे बेकहॅम म्हणाला.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -