धोनी अगदी पुढील वर्षीचा टी-२० वर्ल्डकपही खेळू शकेल!

बालपणीचे प्रशिक्षक बॅनर्जींचे मत

Mumbai

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत मागील काही काळात बरीच चर्चा होत आहे. बुधवारी संध्याकाळी #धोनी रिटायर्स असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत होता. त्यामुळे धोनी खरेच निवृत्त झाला का, असा अनेकांना प्रश्न पडला. मात्र, यात जराही तथ्य नसल्याचे धोनीचे बालपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच तो अगदी पुढील वर्षी होणार्‍या टी-२० विश्वचषकातही खेळू शकेल, असे बॅनर्जी यांना वाटते.

धोनी हा असा व्यक्ती नाही, जो काही लोकांना संपर्क साधून मी निवृत्त होत आहे असे सांगेल. योग्य वेळ आल्यावर तो स्वतःच निवृत्त होईल. त्याबाबतची माहिती तो बीसीसीआयला देईल आणि आपला निर्णय जाहीर करण्यासाठी तो पत्रकार परिषदही बोलावेल. त्याने कसोटीतून निवृत्ती घेतानाही हेच केले होते. तुम्ही सोशल मीडियाला फारसे महत्त्व देऊ नका. तिथे बर्‍याच गोष्टी ट्रेंड होतात आणि नंतर आपल्याला कळते की, त्यात काहीच तथ्य नव्हते. लोक धोनीचा पिच्छा का पुरवत आहेत हेच मला कळत नाही. मी त्याला खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. तो निवृत्त होईल, तेव्हा सर्वांसमोर येऊन याबाबतची घोषणा करेल हे मी खात्रीने सांगू शकतो, असे बॅनर्जी म्हणाले.

यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यास धोनीचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल असे म्हटले जात होते. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे आता धोनीचे पुनरागमन अधिकच अवघड वाटत आहे. मात्र, धोनी खूप फिट असून अगदी पुढील वर्षी होणार्‍या टी-२० विश्वचषकातही खेळू शकेल असे बॅनर्जी यांना वाटते. धोनी अजूनही किती फिट आहे, हे तुम्ही आयपीएलमध्ये पाहाल. यावर्षीचा टी-२० विश्वचषक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र, अगदी पुढील वर्षीच्या विश्वचषकातही तो खेळू शकेल, असे बॅनर्जी यांनी सांगितले.

कधी निवृत्त व्हायचे, त्यालाच ठरवू द्या!
महेंद्रसिंग धोनीचे भारतीय क्रिकेटला खूप मोठे योगदान आहे आणि निवृत्त कधी व्हायचे, हे ठरवण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले. धोनी हा फारच उत्कृष्ट खेळाडू आहे. हुशारी, संयम, ताकद, वेग असे अनेक गुण त्याच्यात असून तो मॅचविनर आहे. याच गोष्टी त्याला इतरांपासून वेगळ्या बनवतात. तो या पिढीतील सर्वोत्तम क्रीडापटूंपैकी एक आहे. निवृत्त कधी व्हायचे, हे ठरवण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. त्याच्यावर दबाव टाकण्याची गरज नाही, असे कर्स्टन म्हणाले.