घरक्रीडामला १६ सदस्यीय संघ पाहिजे होता !

मला १६ सदस्यीय संघ पाहिजे होता !

Subscribe

मला विश्वचषकासाठी १५ नाही तर १६ सदस्यीय संघ पाहिजे होता, असे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री बुधवारी म्हणाले. विश्वचषकासाठी १५ पेक्षा जास्त खेळाडूंची निवड होऊ शकत नाही. ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणार्‍या विश्वचषकासाठी मागील सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली. या संघात युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत आणि फलंदाज अंबाती रायडूला स्थान मिळाले नाही. मात्र, ज्या खेळाडूंना स्थान मिळाले नाही, त्यांना निराश होण्याची गरज नाही, असे शास्त्रींचे मत आहे.

संघ निवडीमध्ये मी हस्तक्षेप करत नाही. माझी काही मते असतील, तर मी ती कर्णधाराला सांगतो. जेव्हा तुम्हाला केवळ १५ खेळाडूच निवडायचे असतात, तेव्हा काही खेळाडू असे असतातच ज्यांना तुम्हाला संघात घ्यायचे असते, पण त्यांना संघात घेता येत नाही. मला हा संघ १६ सदस्यीय असता तर जास्त आवडले असते. इतक्या दीर्घ काळ चालणार्‍या स्पर्धेसाठी १६ खेळाडू संघात असणे योग्य आहे, असे आमचे मत आहे आणि ते आम्ही आयसीसीला कळवले होते. मात्र, त्यांनी १५ खेळाडूच निवडू दिले, असे शास्त्री म्हणाले.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी या संघात चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने अंबाती रायडूला पाठिंबा दर्शवला होता, पण त्याला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले नाही. याबाबत विचारले असता शास्त्री यांनी सांगितले, या क्रमांकावर कोणीही खेळू शकेल. चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे सामन्याची परिस्थिती, हवामान आणि प्रतिस्पर्धी संघ यांच्यावर अवलंबून असेल. आमचे अव्वल तीन फलंदाज कोण असणार हे मात्र निश्चित आहे.

विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार असल्याने त्यांना आणि भारताला ही स्पर्धा जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, भारत नाही तर इंग्लंडच विश्वचषक जिंकण्याचे प्रमुख दावेदार आहेत असे शास्त्रींचे मत आहे. मागील २ वर्षांत इंग्लंडनेच सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्याकडे अप्रतिम फलंदाज आणि गोलंदाज आहेत. तसेच ते घरच्या मैदानावर खेळणार आहेत, याचा त्यांना फायदा मिळेल. त्यामुळे सध्या तरी तेच हा विश्वचषक जिंकण्याचे प्रमुख दावेदार आहेत, असे शास्त्री म्हणाले.

- Advertisement -

रायडू, पंत, सैनी स्टॅन्डबाय

रिषभ पंत, अंबाती रायडू आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हे तिघे विश्वचषकासाठी भारताचे पर्यायी खेळाडू असणार आहेत. कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास या खेळाडूंचा प्रमुख संघात समावेश केला जाईल. भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही तीन पर्यायी खेळाडू निवडले होते. पंत आणि रायडू अनुक्रमे पहिला आणि दुसरा पर्याय आहे, तर सैनीला गोलंदाज म्हणून पर्यायी खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. तसेच सैनीसोबत खलील अहमद, आवेश खान आणि दीपक चहर हे नेट्समधील गोलंदाज म्हणून संघासोबत जाणार आहेत, असेही या अधिकार्‍याने पुढे स्पष्ट केले. खलील, आवेश आणि दीपक हे पर्यायी खेळाडू नाहीत. मात्र, गोलंदाजाला दुखापत झाल्यास त्यांना संधी मिळू शकेल. फलंदाजीचा विचार केल्यास रिषभ आणि रायडू यापैकी एकाला संधी मिळेल, असेही या अधिकार्‍याने पुढे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -