घरक्रीडाकोहली-रोहितच्या झंझावातापुढे विंडीज हतबल

कोहली-रोहितच्या झंझावातापुढे विंडीज हतबल

Subscribe

रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला.

रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे ५ सामन्यांच्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी मिळवली.

हेथमायरचे शतक

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने युवा सलामीवीर चंद्रपॉल हेमराज याला पदार्पणाची संधी दिली. तो या संधीचा फारसा फायदा घेऊ शकला नाही. ९ धावांवर त्याला भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीने बाद केले. यानंतर किरन पॉवेल आणि शाई होप यांनी चांगली फलंदाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. पॉवेलने ३९ चेंडूंत ५१ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सॅम्युएल्स आणि होप झटपट माघारी परतले. त्यामुळे विंडीजची अवस्था ४ बाद ११४ अशी होती. यानंतर शिमरॉन हेथमायर आणि रोवमन पॉवेलने विंडीजचा डाव सावरला. हेथमायरने ४१ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. पॉवेल २२ धावांवर बाद झाला. त्याला जडेजाने बाद केले. पण हेथमायरने आपली आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली. त्याला कर्णधार जेसन होल्डरने चांगली साथ दिली. ३८ व्या षटकात हेथमायरने शमीला षटकार मारत आपले शतक पूर्ण केले. हे शतक करण्यासाठी त्याने अवघे ७४ चेंडू घेतले. १०६ धावा करून तो बाद झाला. यानंतर होल्डर, बिशू आणि रोच यांनी आक्रमक फलंदाजी केल्यामुळे विंडीजने ३२२ धावांचा डोंगर उभारला. भारताकडून युझवेन्द्र चहालने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

रोहित-कोहलीचे शतक

३२३ धावांचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर शिखर धवनला अवघ्या १० धावांवर गमावला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विंडीज गोलंदाजांवर आक्रमण केले. कोहलीने अवघ्या ३५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर रोहितने ५० चेंडूंत ५० धावा केल्या. या दोघांनी अर्धशतकानंतर अधिकच आक्रमक फलंदाजी केली. डावाच्या २७ व्या षटकात रोचला चौकार लगावत कोहलीने आपले एकदिवसीय क्रिकेटमधील ३६ वे शतक पूर्ण केले. तर रोहितने कोहलीच्या पावलावर पाऊल ठेवत ८४ चेंडूंत शतक केले. मात्र, १४० धावांवर कोहली बाद झाला. त्याने रोहितच्या साथीने २४६ धावांची भागीदारी केली. अखेर रोहितने रायडूच्या साथीने उर्वरित धावा करत भारताला विजय मिळवून दिला. रोहित १५२ धावांवर नाबाद राहिला. भारत आणि विंडीज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवार २४ ऑक्टोबरला होईल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -