घरक्रीडाप्रेक्षकांना प्रवेश असल्यास 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना मेलबर्नमध्येच होणार! 

प्रेक्षकांना प्रवेश असल्यास ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना मेलबर्नमध्येच होणार! 

Subscribe

सध्या तरी आम्ही हा सामना मेलबर्नमध्येच घेण्याच्या तयारीत आहोत, असे हॉकली म्हणाले. 

प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असेल, तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्येच (एमसीजी) होईल, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकली यांनी शनिवारी दिली. व्हिक्टोरिया राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन सरकारला तिथे पुन्हा लॉकडाऊन करणे भाग पडले. या पार्श्वभूमीवर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये होणारा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना इतरत्र खेळवावा लागू शकेल अशी चर्चा सुरु होती. परंतु, या सामन्याबाबत इतक्याच कोणताही निर्णय घेता येणार नाही हे हॉकली यांनी स्पष्ट केले आहे.

‘बॉक्सिंग डे’ कसोटीला विशेष महत्त्व

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना मेलबर्नमध्ये होता का, हे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळतो की नाही, यावर अवलंबून आहे. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असेल, तर हा सामना एमसीजी येथेच होईल. सध्या विविध प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा योग्य तो परिणाम होईल आणि लोकांना लवकरच घराबाहेर पडता येईल अशी आम्हाला आशा आहे. प्रेक्षकांना लवकरच पुन्हा स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल अशी आम्ही आशा करत आहोत. ऑस्ट्रेलियातील खेळांच्या वेळापत्रकात ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला विशेष महत्त्व आहे. सध्या तरी आम्ही हा सामना मेलबर्नमध्येच घेण्याच्या तयारीत आहोत, असे हॉकली यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -