आयपीएल सलामीच्या लढतीत मुंबई-चेन्नई आमनेसामने!

तेराव्या मोसमाचे वेळापत्रक जाहीर

Mumbai

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) दोन सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखले जातात. मागील मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईचा अवघ्या एका धावेने पराभव करत विक्रमी चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. आता २९ मार्चपासून सुरु होणार्‍या आयपीएलच्या तेराव्या मोसमाची सलामीची लढतीही याच दोन संघांत होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रविवारी आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

यंदाच्या मोसमात शनिवारी दुपार आणि संध्याकाळ असे दोन सामने (डबल-हेडर) न होता, केवळ संध्याकाळीच सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा एका आठवड्याने वाढणार आहे. फक्त रविवारी दोन सामने होणार आहेत. यंदाच्या मोसमातील अखेरचा साखळी सामना १७ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या संघांत बंगळुरूला होईल. त्यानंतर बाद फेरी होणार असून अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत रंगणार आहे.

मुंबई इंडियन्सचे सामने –
२९ मार्च वि. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (मुंबईत, रात्री ८), १ एप्रिल वि. सनरायजर्स हैदराबाद (हैदराबादमध्ये, रात्री ८), ५ एप्रिल वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (मुंबईत, दुपारी ४), ८ एप्रिल वि. किंग्स इलेव्हन पंजाब (मोहालीत, रात्री ८), १२ एप्रिल वि. कोलकाता नाईट रायडर्स (कोलकात्यात, रात्री ८), १५ एप्रिल वि. राजस्थान रॉयल्स (मुंबईत, रात्री ८), २० एप्रिल वि. किंग्स इलेव्हन पंजाब (मुंबईत, रात्री ८), २४ एप्रिल वि. चेन्नई सुपर किंग्स (चेन्नईत, रात्री ८), २८ एप्रिल वि. कोलकाता नाईट रायडर्स (मुंबईत, रात्री ८), १ मे वि. दिल्ली कॅपिटल्स (मुंबईत, रात्री ८), ६ मे वि. दिल्ली कॅपिटल्स (दिल्लीत, रात्री ८), ९ मे वि. सनरायजर्स हैदराबाद (मुंबईत, रात्री ८), ११ मे वि. राजस्थान रॉयल्स (जयपूरमध्ये, रात्री ८), १७ मे वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (बंगळुरूत, रात्री ८).

१ मार्चपासून धोनीची सरावाला सुरुवात!

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर एकही सामना खेळलेला नाही. मात्र, धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणार असून १ मार्चपासून तो पुन्हा सरावाला सुरुवात करणार आहे. तो चेन्नईमधील चेपॉकच्या मैदानावर जवळपास दोन आठवडे सराव करणार आहे. त्यानंतर काही दिवसांसाठी घरी परतून तो पुन्हा आयपीएलच्या तयारीला लागेल. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार असून सलामीच्या सामन्यात धोनीच्या चेन्नईसमोर गतविजेत्या रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचे आव्हान असेल.