घरक्रीडामयांकचे धडाकेबाज द्विशतक

मयांकचे धडाकेबाज द्विशतक

Subscribe

दुसर्‍या दिवसअखेर भारत ६ बाद ४९३

सलामीवीर मयांक अगरवालने लगावलेल्या धडाकेबाज द्विशतकामुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवसअखेर भारताची ६ बाद ४९३ अशी धावसंख्या होती. मयांकने पहिल्या डावात ३३० चेंडूत २८ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने २४३ धावांची खेळी केली. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील दुसरे द्विशतक होते. त्याला चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांनी अर्धशतके करत उत्तम साथ दिली. त्यामुळे भारताला दुसर्‍या दिवसअखेर पहिल्या डावात ३४३ धावांची आघाडी मिळाली. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर आटोपला होता.

दुसर्‍या दिवशी १ बाद ८६ वरून पुढे खेळताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. दिवसाच्या दुसर्‍याच षटकात पुजाराने सलग दोन चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्याला अबू जायेदने ५४ धावांवर माघारी पाठवले. त्याने आणि मयांकने दुसर्‍या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. जायेदने आपल्या पुढच्याच षटकात कर्णधार विराट कोहलीला पायचीत पकडले. कोहलीला खातेही उघडता आले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये खाते न उघडता बाद होण्याची ही कोहलीची दहावी वेळ होती. मयांकने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत ९८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेची उत्तम साथ लाभली. या दोघांनी डाव सावरल्यामुळे दुसर्‍या दिवशी लंचपर्यंत भारताची ३ बाद १८८ अशी धावसंख्या होती.

- Advertisement -

लंचनंतरच्या काही षटकांतच इबादत हुसेनच्या गोलंदाजीवर २ धावा काढत मयांकने आपले शतक पूर्ण केले. त्याने हे शतक पूर्ण करण्यासाठी १८३ चेंडू घेतले. रहाणेने जायेदच्या गोलंदाजीवर चौकार लगावत आपले अर्धशतक झळकावले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील २१ वे, तर मागील नऊ डावांतील सहावे अर्धशतक होते. त्याने आणि मयांकने धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. डावखुरा फिरकीपटू तैजुल इस्लाम टाकत असलेल्या ७७ व्या षटकात मयांकने १५० धावा केल्या. या दोघांमुळे भारताने दुसर्‍या सत्रात एकही विकेट न गमावता ११५ धावा जोडल्या.

चहापानानंतर मात्र रहाणे फारकाळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. अवघ्या दुसर्‍याच षटकात त्याला जायेदने तैजुलकरवी झेलबाद केले. रहाणेने १७२ चेंडूत ९ चौकारांसह ८६ धावांची खेळी केली. तसेच त्याने मयांकसोबत १९० धावांची भर घातली. मयांकने मात्र अधिक आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली. त्याने सलग दोन षटकांत एक चौकार आणि एक षटकार लगावत आपले द्विशतक झळकावले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक होते. हा मयांकचा केवळ आठवा कसोटी सामना आहे. द्विशतक झाल्यानंतर मयांकने गोलंदाजांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

रविंद्र जाडेजानेही आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे १०० षटकांनंतर ४ बाद ३६८ अशी धावसंख्या असणार्‍या भारताची १०७ षटकांनंतर ४ बाद ४२६ अशी धावसंख्या झाली. या सात षटकांत भारतीय जोडीने ५८ धावांची भर घातली. अखेर मयांकला मेहदी हसनने २४३ धावांवर माघारी पाठवले. वृद्धिमान साहा मात्र फारकाळ खेळपट्टीवर टिकला नाही. अवघ्या १२ धावांवर तो बाद झाला. यानंतर मात्र बांगलादेशला भारतीय फलंदाजाला बाद करता आले नाही. त्यामुळे दुसर्‍या दिवसअखेर ११४ षटकांत भारताची ६ बाद ४९३ अशी धावसंख्या होती. जाडेजा ६०, तर उमेश यादव २५ धावांवर नाबाद होता.

संक्षिप्त धावफलक – बांगलादेश : पहिला डाव – सर्वबाद १५० वि. भारत : पहिला डाव – ११४ षटकांत ६ बाद ४९३ (मयांक अगरवाल २४३, अजिंक्य रहाणे ८६, रविंद्र जाडेजा नाबाद ६०, चेतेश्वर पुजारा ५४; अबू जायेद ४/१०८).

१२ डाव, २ द्विशतके!
भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात २४३ धावांची खेळी केली. हे त्याचे अवघ्या १२ कसोटी डावांतील दुसरे द्विशतक होते. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात २१५ धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत दोन द्विशतके करणार्‍या भारतीय फलंदाजांमध्ये मयांकचा दुसरा क्रमांक लागतो. या यादीत अव्वल स्थानी असणार्‍या विनोद कांबळीने अवघ्या ५ डावांमध्येच दोन द्विशतके झळकावली होती. तसेच चेतेश्वर पुजाराने १८ डावांमध्ये २ द्विशतके केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -