हे सुवर्णपदक आईचं बर्थडे गिफ्ट – सिंधू

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. हे सुवर्णपदक आईला बर्थडे गिफ्ट असल्याचे मत तिने व्यक्त केले.

f78r6ok_pv-sindhu-_625x300_25_August_19
सुवर्णपदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली

भारताची सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत जागतिक बॅडमिंटन स्पर्धा आपल्या नावावर केली आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे आजच तिच्या आईचा वाढदिवस आहे. त्यामुळे हे सुवर्णपदक माझ्या आईला बर्थ डे गिफ्ट असल्याचं मत पी. व्ही. सिंधूने व्यक्त केलं. प्रेक्षकांनीही सामन्यादरम्यान ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘वंदे मातरम्’चा गजर करत स्वित्झर्लंडचा बॅडमिंटन कोर्ट दुमदुमून गेला.

पाठीराख्यांमुळे उत्साह दुणावला

अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूपुढे जपानच्या नोझोमी ओकुहाराचे आव्हान होते. सामन्याच्या पहिल्या गेमपासून ते संपूर्ण सामन्यावर सिंधूचेच वर्चस्व होते. अवघ्या १६ मिनीटांतच नेट प्लेसिंग आणि परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ करत सिंधूने पहिला गेम २१-७ च्या फरकाने स्वतःच्या नावावर केला. अंतिम सामना स्वित्झर्लंडमध्ये असून देखील सिंधूला प्रेक्षकांकडून चांगला पाठींबा मिळाला. यावेळी प्रेक्षकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘वंदे मातरम्’ चा गजर करत बॅडमिंटन कोर्ट दुमदुमून सोडला.

हेही वाचा – पी. व्ही. सिंधू जगज्जेती! अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत विजय!

दुसरा गेमवरही सिंधूच्याच नावे

सामन्यातील पहिल्या गेमप्रमाणेच दुसऱ्या गेममध्ये देखील सिंधूचेच वर्चस्व होते. यावेळी जपानच्या ओकुराहावर प्रचंड ताण होता. याचाच फायदा घेत अवघ्या सहा मिनीटांतच सिंधूने ७-२ अशी आघाडी घेतली. संपूर्ण सामन्यात सिंधूचेच वर्चस्व पहायला मिळाले. शेवटी २१-७, २१-७ असा या फरकाने सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

सुवर्ण पदक आईचं गिफ्ट

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर सिंधूने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तिच्या चेहऱ्यावर स्मित होते. ती म्हणाली की, ”हा विजय माझ्यासाठी विशेष आहे. याच क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते. आजच्या दिवशी हा विजय मिळाल्याने माझा आनंद द्विगुणित झाला आहे. कारण आजच माझ्या आईचा वाढदिवस असून हे तिला माझ्याकडून मिळालेले सर्वोत्तम गिफ्ट असेल.”