घरक्रीडाभारतीय संघाचे नेतृत्व केल्याचा अभिमान! -हरमनप्रीत

भारतीय संघाचे नेतृत्व केल्याचा अभिमान! -हरमनप्रीत

Subscribe

न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात पराभव करून भारतीय पुरुष हॉकी संघाने नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. टोकियो येथे झालेल्या या स्पर्धेसाठी कर्णधार मनप्रीत सिंग, गोलरक्षक श्रीजेश यांना विश्रांती देण्यात आली होती. या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगला या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. भारतीय संघांच्या कर्णधारपदी निवड होण्याची ही हरमनप्रीतची पहिलीच वेळ होती. ही संधी मिळाल्याबद्दल तो आनंदी होता. भारतीय संघाचे नेतृत्व केल्याचा मला अभिमान आहे, असे विधान हरमनप्रीतने केले.

ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आमच्या संघात बर्‍याच युवा खेळाडूंचा समावेश होता. या युवकांना त्यांच्यातील प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले याचा मला आनंद आहे. आमच्या संघाने जपान, मलेशिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध अप्रतिम खेळ केला. या स्पर्धेसाठी माझी कर्णधारपदी निवड झाली होती. भारतीय संघाचे नेतृत्व केल्याचा मला अभिमान आहे, असे २३ वर्षीय हरमनप्रीत म्हणाला.

- Advertisement -

भारताने ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मलेशियाचा ६-० असा धुव्वा उडवला होता. दुसर्‍या सामन्यात मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने त्यांना २-१ असे पराभूत केले. परंतु, तिसर्‍या साखळी सामन्यात भारताने जपानवर ६-३ अशी आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ५-० अशी मात केली. कर्णधार हरमनप्रीतने या स्पर्धेत २ गोल केले. त्याचे दोन्ही गोल न्यूझीलंडविरुद्धच आले. गोल मारण्याबाबत तो म्हणाला, ज्युनियर गटांमध्ये खेळत असल्यापासूनच गोल मारण्यावर मी खूप मेहनत घेतली आहे. मी प्रशिक्षकांसोबत ड्रॅग-फ्लीकिंगवर खूप काम करत आहे. आता त्या मेहनतीचे फळ मिळत असल्याचा मला आनंद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -