घरक्रीडाकर्नाटकासमोर मुंबईचे लोटांगण!

कर्नाटकासमोर मुंबईचे लोटांगण!

Subscribe

गेल्या सात वर्षांत रणजी स्पर्धेत मुंबईला कर्नाटकाकडून सहा पैकी चार लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. रविवारी बीकेसी स्टेडियमवरील लढतीत कर्नाटकाने मुंबईला ५ गडी राखून हरवत निर्णायक विजयाचे ६ गुण मिळवले. आता चार सामन्यांतून कर्नाटकचे १६, तर मुंबईचे ३ सामन्यांत ६ गुण झाले आहेत. मुंबईसाठी चिंताजनक बाब म्हणजे रेल्वे आणि कर्नाटकविरुद्ध चार डावांत एकदाही द्विशतकी मजल मारता आली नाही.

तिसर्‍या दिवशी मुंबईचा दुसरा डाव १४९ धावांवर आटोपला. सर्फराज खानचा (१४० चेंडूत २ षटकार आणि ८ चौकारांसह नाबाद ७१ धावा) अपवाद वगळता इतरांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. शम्स मुलानीने सर्फराजसोबत पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली, हीच काय ती मुंबईसाठी दिलासादायक बाब! कर्नाटकाच्या प्रतीक जैनने झटपट चार मोहरे टिपत मुंबईच्या शेपटाला वळवळ करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे मुंबईचा डाव दीडशेच्या आतच कोसळला. कर्नाटकासमोर विजयासाठी १२६ धावांचे माफक आव्हान होते.

- Advertisement -

सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि समर्थ यांनी दुसर्‍या डावातही कर्नाटकाला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी १४ षटकांतच ७८ धावांची भागीदारी करून दिल्यावर शशांक अत्तरदेच्या ऑफस्पिनने पडिक्कलला ५० धावांवर पायचीत पकडत कर्नाटकची सलामीची जोडी फोडली. शशांकनेक मग अभिषेक रेड्डीला डायसकरवी झेलबाद केले. तर डावखुर्‍या शम्स मुलानीने समर्थला (३४) बाद केले. मात्र, त्यानंतर कर्णधार करुण नायर (१०) आणि पदार्पण करणार्‍या रोहन कदम (२१) यांनी कर्णकटाचे शतक फलकावर लावले. या दोघांनाही शशांकने यष्टिरक्षक तरेकरवी झेलबाद केले. पहिल्या डावात ५ मोहरे टिपणार्‍या शशांकने दुसर्‍या डावात ५२ धावांच्या ४ गडी बाद केले. सामन्यात ११० धावांत ९ बळी ही कामगिरी निश्चितच वाखाणण्याजोगी! मात्र, जळगावच्या या युवकाचे प्रयत्न फोल ठरले. श्रेयस गोपाळने मुलानीला चौकार लगावत कर्नाटकाचा विजय साजरा केला.

आठवडाभरातील सलग दोन पराभवांमुळे मुंबईची कामगिरी खालवल्याचे स्पष्ट होते. रणजीच्या बाद फेरीत प्रवेश करणार्‍यासाठी मुंबईसमोर अवघड आव्हान असेल. कर्णधार सूर्यकुमार यादव, कसोटीपटू अजिंक्य रहाणे आणि जायबंदी पृथ्वी शॉ यांची न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारत अ संघात निवड झाली आहे. ११ जानेवारीला दिल्लीमार्गे भारत अ संघ न्यूझीलंडला रवाना होईल. या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबईची बाजू अधिकच कमकुवत होईल. तामिळनाडू (चेन्नई), उत्तर प्रदेश (मुंबई), हिमाचल प्रदेश (धर्मशाळा), सौराष्ट्र (राजकोट) आणि मध्य प्रदेश (मुंबई) या संघांशी मुंबईला उरलेल्या लढतीत सामोरे जावे लागेल. या सामन्यांत चांगली कामगिरी केली, तरच मुंबईला बाद फेरीची उमेद बाळगता येईल.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

मुंबई : १९४ आणि १४९ (सर्फराज खान नाबाद ७१, शम्स मुलानी ३१; प्रतीक जैन ४/११, अभिमन्यू मिथून ३/६२) पराभूत वि. कर्नाटक : २१८ आणि ५ बाद १२९ (देवदत्त पडिक्कल ५०, समर्थ ३४; शशांक अत्तरदे ४/५२).

अजूनही आम्हाला विजयाची संधी – सूर्यकुमार

दोन्ही डावांत आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण फलंदाजी अपयशी ठरली. सामन्यात आम्ही निकराने खेळ केला असता, तर सामन्याचा निकाल बदलू शकला असता, हे उद्गार आहेत मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे. घरच्या मैदानावर लागोपाठ दोन सामन्यांत मुंबईला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमारने दोन्ही हात वर करून आपली शरणागती आधीच व्यक्त केली होती. परंतु, आम्हाला अजूनही संधी आहे. खासकरून आम्ही मुंबईबाहेर चांगला खेळ केला आहे, असे आपल्या सहकार्‍यांना उमेद दाखवताना सूर्यकुमार म्हणाला. मुंबईची पुढील लढत चेपॉकवर तामिळनाडूविरुद्ध होणार आहे. स्वतः सूर्यकुमार, अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ या तीन मुंबईकर खेळाडूंची निवड भारत अ संघात झाल्यामुळे मुंबईची बाजू कमकुवत होईल का, असे विचारले असता कर्णधार म्हणाला, नवोदितांना संधी आहे. ते या संधीचा फायदा घेतील अशी आशा त्याने व्यक्त केले. तसेच जायबंदी पृथ्वीबाबत विचारले असता सूर्यकुमारने सांगितले, दुसर्‍या डावात मुंबईची अवस्था ४ बाद २६ अशी झाली असताना पृथ्वीने माझ्याकडे फलंदाजीची इच्छा प्रदर्शित केली. परंतु, त्याची दुखापत इतकी बळावल्यामुळे (त्याला हातात जेवणाची डिश धरणेही कठीण जात होते) संघ व्यवस्थापनाने त्याला फलंदाजीला न पाठवण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी जायबंदी झाल्यावर रहाणेने स्वतःहून सलामीला जाण्याची इच्छा प्रदर्शित केली.

आमच्या गोलंदाजांनी कमाल केली – करुण
मुंबईला मुंबईत हरवल्यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे उद्गार कर्नाटकचा कर्णधार करुण नायरने काढले. मिथून, कौशिक, जैन आणि मोरे या तेज चौकडीची तारीफ करताना करुण म्हणाला, त्यांनी अप्रतिम गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजीला दोन्ही डावांत झटपट गुंडाळले. बीकेसीची खेळपट्टी हिरवीगार असल्याने ती वेगवान गोलंदाजीला अनुकूल असेल असे आम्हाला वाटले आणि आम्ही चार वेगवान गोलंदाज खेळवले. आमचा हा निर्णय योग्य ठरला. पहिल्या डावात आम्हाला २४ धावांची नाममात्र आघाडी मिळाली, पण आमचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे चौथ्या डावात १२५ धावांचे आव्हान आम्ही सहज पार करू असे वाटले आणि तसेच झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -