कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेऊन ‘ती’ धावते

Mumbai
पूनम

भारतात खेड्यापाड्यात अनेक होतकरू खेळाडू घडत आहेत, पण दुर्दैवाने त्यांचा मार्ग हा त्यांच्या आयुष्याप्रमाणे खाचखळग्यांचाच आहे. त्यांना स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजूनही प्रत्येक टप्प्यावर झगडावे लागत आहे आणि त्यात घरच्यांची जबाबदारी खांद्यावर असल्यास त्यांना दुहेरी कसरत करावी लागते. याच दुहेरी कसरतीतही सर्व खेळाडू यशस्वी होतीलच असे नाही, परंतु जे यशस्वी होतात ते अनेकांसमोर प्रेरणा ठेवून जातात. असाच एक प्रेरणादायी पल्ला पुण्याच्या पूनम सोनुने हीने गाठला आहे. धावपटू बनण्याच्या स्वप्नाबरोबरच मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या खर्चाचा भार तिने स्वतःच्या खांद्यावर घेतला.

शर्यतीतून मिळत गेलेल्या बक्षीसातून तिने बहिणीचे लग्नही लावून दिले. परंतु तिला मात्र बहिणीच्या डोक्यावर अक्षता टाकता आल्या नाही. पूनमचे वडील शेतमजुरी करून पत्नी, तीन मुली आणि मुलाच्या संसाराचा गाडा हाकतात. तुटपुंजा मजुरीवर त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह चालतो. पूनमची आई शहरात जाऊन भाजी विक्रीचा व्यवसाय करते. अशात पूनमच्या वडिलांनी मोठ्या मुलीच्या लग्नाचा निर्णय घेतला. आपले वडील लग्नाचा आर्थिक भार पेलू शकत नाही, याची कल्पना असल्याने पूनमने ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील सागवान गावची पूनम नाशिक येथील विजेंद्रसिंह यांच्याकडे सराव करते. मोठी बहीण रुपालीचे लग्न झाले आणि दुसरी मोठी बहीण साधनाचे बीएपर्यंत शिक्षण झालेले आहे. तिच्या लग्नाची तयारी सुरू झाली.

साधनाच्या लग्नाचा खर्च उचल्याचा निश्चय करत पूनमने पुणे येथे पुनावाला क्लिन सिटी मॅरेथॉन होती. 21 किलोमीटरचे अंतर धावण्याचा पूनमला सराव नसतानाही ती शर्यतीत उतरली. ती केवळ शर्यतीत उतरली नाही तर 1.25 लाखांचे बक्षीस जिंकून तिने लग्नाचा भार उचलला. पण, ज्यासाठी तिने ही धडपड केली, त्या लग्नाला मात्र तिला हजर राहता आले नाही. आगामी दक्षिण आशिया स्पर्धेसाठी तिची निवड झाली आणि बहिणीचे लग्न व स्पर्धा एकाच वेळी आली. आता पूनमला ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न आहे. खेळाच्या माध्यमातून नोकरी लागल्यास तिला वडिलांनी घेतलेले कर्जही फेडायचे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here