घरक्रीडामुशफिकूर, शाकिबचा झंझावात सुरुच; बांगलादेश २६२

मुशफिकूर, शाकिबचा झंझावात सुरुच; बांगलादेश २६२

Subscribe

मुशफिकूर रहीम आणि शाकिब अल हसनच्या अर्धशतकांच्या जोरावर बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध विश्वचषकाच्या सामन्यात ५० षटकांत ७ बाद २६२ अशी धावसंख्या उभारली. रहीमचे हे या विश्वचषकातील दुसरे अर्धशतक होते, तर त्याने एक शतकही झळकावले आहे. शाकिबचे हे या स्पर्धेतील तिसरे अर्धशतक होते. तसेच त्याने दोन शतकेही लगावली आहेत. या खेळीदरम्यान शाकिब विश्वचषकात १००० धावांचा टप्पा पार करणारा पहिला बांगलादेशी खेळाडू ठरला .

या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात बांगलादेशच्या डावाची सुरुवात तमिम इक्बालसह सौम्या सरकारने न करता लिटन दासने केली. मात्र, त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही. १६ धावांवर त्याला मुजीब उर रहमानने बाद करत बांगलादेशला पहिला झटका दिला. यानंतर शाकिब आणि तमिमने चांगली फलंदाजी करत दुसर्‍या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. संयमाने खेळणार्‍या तमिमचा ३६ धावांवर त्रिफळा उडवत मोहम्मद नबीने ही जोडी फोडली. शाकिबने मात्र आपली दमदार फलंदाजी सुरु ठेवत ६६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, ५१ धावांवर त्याला मुजीबने पायचीत पकडले.

- Advertisement -

त्याने आपल्या पूर्ण डावात केवळ १ चौकार लगावला. तसेच त्याने आणि मुशफिकूरने तिसर्‍या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. या स्पर्धेत पहिल्यांदा मधल्या फळीत खेळणारा सौम्या अवघ्या ३ धावांवर माघारी परतला. मुशफिकूरने एक बाजू लावून धरत ५६ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याला काही काळ महमदुल्लाहने चांगली साथ दिली, पण २७ धावांवर त्याला गुलबदीनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर मुशफिकूर आणि मोसादेक हुसेनने धावांची गती वाढवली. मुशफिकूरने ८७ चेंडूत ८३ धावा आणि मोसादेकने २४ चेंडूत ३५ धावा केल्यामुळे बांगलादेशने ७ बाद २६२ अशी धावसंख्या उभारली.

संक्षिप्त धावफलक –

- Advertisement -

बांगलादेश : ५० षटकांत ७ बाद २६२ (मुशफिकूर रहीम ८३, शाकिब अल हसन ५१, तमिम इक्बाल ३६; मुजीब उर रहमान ३/३९, गुलबदीन नैब २/५६) वि. अफगाणिस्तान.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -