घरमुंबईकलाक्षेत्रातील संधी

कलाक्षेत्रातील संधी

Subscribe

आपलं करिअर

आर्ट्समध्ये संधी आहे का? पूर्वीचा हा पावलोपावली ऐकायला येणारा प्रश्न सध्या कालबाह्य होताना दिसत आहे. त्याचं कारण कलेचं विस्तारत जाणारं क्षेत्र. संरक्षण दल, नागरी सेवा, स्पर्धा परीक्षा, टुरिस्ट-गाईड, ट्रॅव्हल व टूरिझम विषयक संधी फाईन आर्ट्स या पारंपरिक संधीसह भिन्न विषयातील संधीमुळे यशाचा मार्ग खुला होऊन आर्ट्समध्ये विविध संधी उपलब्ध होत आहेत. कला शाखेत प्रवेश घेतल्यास कोणत्या संधी आहेत याची आपण माहिती घेऊया!

कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी स्वत:चे गुण, अंगीभूत कौशल्य, नवे ज्ञान, तंत्र अवगत करण्याची क्षमता याची जाण व भान ठेऊनच विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडावे. बारावीनंतर डी.एडला प्रवेश घेत प्राथमिक शिक्षक तर बीएड प्रवेश घेत माध्यमिक शिक्षक होता येते. परंतु एमए केल्यास ज्यूनियर कॉलेजची मजल मारता येते. नेट, सेट सारख्या परीक्षांनंतर डिग्री कॉलेजमध्ये अध्यापनही करता येते. एमएसडब्ल्यू सारखे कोर्सेस समाजकार्याची व्याप्ती समजावत अनेक सरकारी, गैरसरकारी क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देतात. त्याचप्रमाणे गृहमंत्रालय व कारागृह विभाग, समाजकल्याण संचालनालय, केंद्रीय समाजकल्याण मंत्रालय तसेच कॉर्पोरेटस क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध आहेत.

- Advertisement -

बॅचलर ऑफ मास मीडिया या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा सध्या कल वाढत आहे. पत्रकारिता, संकलन, जनसंपर्क, टीव्ही, रेडिओ, सिनेमा क्षेत्रातील अनेक दालने यामुळे खुली झाली आहेत. लोककलांचा अभ्यास, संगीत, नृत्यशास्त्र, नाट्यशास्त्र हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. प्रत्येक विषय हा एक शोधच आहे आणि सर्वच विषय महत्त्वाचे असतात. स्वत:ची आवड, क्षमता, कल ओळखून पदवी, पदव्युत्तर व पुढे डॉक्टरेट करता येते. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांचे अध्ययन करत लिपींचेही अध्ययन करण्याचेही उत्तम पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत. तसेच परदेशी भाषा शिकल्यास अनुवादक म्हणून नोकरीचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. राजकीय घडामोडी व रणनितीचा अभ्यास करणारे राज्यशास्त्र, बँकिंगसह अनेक वित्तीय संस्थांच्या परीक्षा देण्यासाठी सहाय्य करणारे अर्थशास्त्र, भिन्न पातळ्यांवर संस्थांमध्ये समुपदेशन करण्यासाठी असलेले मानसशास्त्र हे विषय महत्त्वाचे आहेतच.

परंतु समाजशास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी कोणतेच विषय कमी नाहीत. निसर्गाचे जतन, संवर्धन करण्यासाठी पृथ्वी व निसर्ग यांच्यातील अनन्य संबंध समजावून घेऊन पुढे जाण्यासाठी पर्यावरणशास्त्र महत्त्वाचे आहे. निसर्गासह आपला वारसा जतन करणारे म्युझियोलॉजी म्हणजे वस्तूसंग्रहालय शास्त्राची पदवी मिळवून इतिहासाचे जतन, संवर्धनाचे काम करण्याची संधी मिळू शकते. पुरातत्त्वशास्त्र, नाणकशास्त्र, कोरीव लेखशास्त्र या शास्त्रांमध्येही अनेक संधी आहेत. परंतु या विषयांमध्ये प्रावीण्यासाठी आणि नोकरीच्या संधीसाठी थोडी जास्त प्रतीक्षा करावी लागते. दफ्तरशास्त्र आज एक प्रगतावस्थेचे शिखर गाठत असताना बिझनेस अर्काईव्ह या संकल्पनेमुळे या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. असे अनेक पर्याय कला शाखेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.

- Advertisement -

-दीपक सूर्यवंशी, प्रोफसर, गुरूनानक कॉलेज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -