घरमुंबईजड - अवजड वाहनांसाठी डावी मार्गिकाच

जड – अवजड वाहनांसाठी डावी मार्गिकाच

Subscribe

राज्याच्या वाहतूक विभागाची अधिसूचना

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर डाव्या बाजुने होणार्‍या ओव्हरटेकिंगने अपघात कमी करण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी कायद्याचा फार्स अधिक घट्ट करण्याचे ठरविले आहे. एक्सप्रेस हायवेवर ओव्हरटेकिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी आता मोटर वाहन कायद्यान्वये अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नव्या अधिसूचनेनुसार उजव्या बाजुने वाहन चालवण्यासाठी १००० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर जड तसेच अवजड वाहनांची वाहतुक प्रत्येक मार्गाच्या डाव्या मार्गिकेमधून करण्यासाठी निर्बंधाबाबतची अधिसूचना जारी केली आहे. येत्या दिवसांमध्ये जड तसेच अवजड वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणावर ही दंड वसुली करण्यात येणार आहे असे वाहतुक पोलिसांकडून स्पष्ट केले आहे.

मोटर वाहन कायद्यातील अधिसूचनेनुसार मुंबई पुणे एक्सप्रेस हायेवर जड तसेच अवजड वाहनांना मार्गक्रमण करण्यासाठी प्रत्येक मार्गाच्या डावीकडील मार्गिका निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मार्गाच्या उजव्या बाजुच्या मार्गिकेमधून वाहनांना मार्गक्रमण करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. जड तसेच अवजड वाहनांना प्रत्येक मार्गाच्या दिशेने मधल्या मार्गिकेतुन वाहतुकीची परिस्थिती पाहून ओव्हरटेक करण्यात येईल. जड – अवजड वाहनांना घाट परिसरात ओव्हरटेकिंग करण्यास मात्र मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वाहने, रूग्णवाहिका, अग्निशमन वाहने, पोलिस व शासकीय वाहने, अतिमहत्वाच्या (व्हीआयपी) वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. राज्याचे वाहतूक विभागाचे अप्पर महासंचालक विनय कारगांवकर यांनी मोटर वाहन कायद्यान्वये अधिकाराचा वापर करून ही अधिसूचना जारी केली आहे. सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर तसेच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक मार्गावर तीन मार्गिका आहेत. अनेक प्रवासी बसेस, जड, अवजड वाहने डाव्या मार्गिकेमधून न जाता उजव्या मार्गिकेमधून जाताना वाहतूक विभागाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. जड तसेच अनेक अवजड वाहने डाव्या मार्गिकेएवजी उजव्या मार्गिकेतून जात असल्यानेच हे अपघात होत असल्याचे वाहतूक विभागाचे म्हणणे आहे.

- Advertisement -

आम्ही गेल्या महिन्याभरात उजवी मार्गिका अडवणार्‍या वाहन चालकांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. त्यासोबतच जड तसेच अवजड वाहतूकदारांच्या संघनांनाही मार्गिकेची शिस्त पाळण्यासाठीचे आवाहन केले आहे. या मोहिमेचा भाग म्हणूनच वाहनांवर स्टिकर लावण्यातही आले आहे अशी माहिती वाहतूक विभागाचे अधिक्षक विजय पाटील यांनी दिली. उजवी मार्गिका वापरणार्‍या जड व अवजड वाहन चालकांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी वर्गालाही याबाबतची माहिती देऊन कारवाईला सुरूवात होईल असे त्यांनी सांगितले. जड – अवजड वाहन चालकांसाठी डाव्या मार्गिकेचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दिशादर्शक फलकांचा वापर करण्यात आलेला आहे. आम्ही एमएसआरडीसीला आणखी फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत असेही ते म्हणाले.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेले अपघात
वर्ष -अपघात- मृत्यू
२०१६-९८- १५१
२०१७ -८९ -१०५
२०१८ -९६- ११०
२०१९(जून)- ४० -४७

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -