घरक्रीडामहाराष्ट्राच्या अपयशाचे खापर कुणाच्या माथी?

महाराष्ट्राच्या अपयशाचे खापर कुणाच्या माथी?

Subscribe

महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघाची गेल्या काही वर्षांत उतरत्या कामगिरीची म्हणा किंवा पायरी पायरीने घसरण होताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेत प्रथमच साखळीतच बाद होण्याची वेळ महाराष्ट्र राज्यावर आली. याबाबत ना राज्य कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना खंत ना यांना खेद वाटत आहे! तसं पाहता पाटणा येथील या स्पर्धेत अनेक राज्ये काही तांत्रिक कारणाने सहभागी झालेली नव्हती. तरीही महाराष्ट्र संघाची ही अवस्था झाली. गटातील अवघ्या तीन सामन्यात संघाचे प्रशिक्षक अर्जुनवीर राजू भावसार आणि व्यवस्थापिका राष्ट्रीय खेळाडू मनिषा गावंड याचंही संघाच्या कामगिरीवर लक्ष नव्हते, असेच म्हणावे लागेल!

आता यावर विविध माध्यमातून चर्चा, वाद घडवून आणले जातील. परंतु पुढे हे सारं काही विसरून किंवा येरे माझ्या मागल्या कार्यपद्धतीवर या गोष्टीकडे कानाडोळा करून राज्य कबड्डी असो. गांभीर्याने काहीच करणार नाही. आज गेली अनेक वर्षे हीच कार्यपद्धत बुवानंतर सुरू आहे. अनेकांच्या पत्रांना उत्तरे द्यायचीच नाहीत. पत्रांना पदाधिकारी उत्तरे देऊ शकत नाहीत की त्यांची उत्तरे देण्याची कुवत नाही? मात्र असे जरी काही असलं तरी या सर्वांना येथील पदाचा लाभ सोडवत नाही.

- Advertisement -

राज्य असो.कडून काढण्यात आलेली पत्रके वाचली की प्रश्न पडतो? अरे! अशी मंडळी पदाधिकारी म्हणून राज्य असोसिएशनच्या कार्यकारिणीवरर पदाधिकारी म्हणून निवडून तरी कशी देतात? विविध जिल्हा संघटनांचा काही अपवाद वगळता प्रतिनिधींना राज्य असोसिएशनच्या कार्यकारिणीवर येण्यासाठी केंद्र व राज्याची आचारसंहिता गुंडाळून येथे पदे घेण्यास उत्सुक असल्याने यांनी कबड्डी विकास, खेळाडूंची गुणवत्ता, प्रशासकीय कामकाज आदी सारंच काही गुंडाळून ठेवलेलं आहे असं म्हटलं तर काही चुकीचं नाही. योग्य कालावधीनंतर अनेक गोपनीय गोष्टींचा उलगडा होत जाणारच आहे!
प्रचंड लोकसंख्या जवळपास १३२ कोटी असलेल्या भारतात आता क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस आलेले दिसत आहेत. अनेक भारतीय खेळाडू व संघ आपल्या विविध क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर विजयश्री मिळवून भारताचे नाव उज्ज्वल करीत आहेत.

नव्या-नव्या तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. या अशा ज्ञानाच्या माध्यमातूनच आपणासही विविध क्षेत्रातील उंबरठ्याजवळ येऊन पोहचण्यास नक्कीच मदत झालेली आहे. ही प्रणाली आपण कोणत्या व कशासाठी आणि कोणत्या प्रकारे याचा वापर करणार हा जसा प्रश्न आहे तसाच यासाठी आवश्यक असणारी अभ्यासू प्रवृत्ती आपल्या तज्ज्ञ प्रशिक्षक मंडळींकडे असणं आवश्यक आहे. आज अशी समयसूचकता, सांख्यिकी व मनोवैज्ञानिक कार्यपद्धत क्रीडाक्षेत्रातही आलेली पहावयास मिळते. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांकडे नजर मारता या गोष्टींचा विविध क्रीडा प्रकारात नक्कीच यश प्राप्त होत असल्याचा परिणाम दिसून येत आहे. कबड्डीला अपयश आलं ते याची उणीव असल्यामुळे.

- Advertisement -

सांख्यिकी व मनोवैज्ञानिक माहितीमुळे विरुद्ध संघाचे अथव अन्य संघांचे, खेळाडूंची कौशल्ये फार चांगल्या प्रकारे अभ्यासता येतात. त्याचप्रमाणे या यांच्या कौशल्यावर आपण त्यांच्या कौशल्यांचे कच्चे दुवे काय आहेत व त्यानुसार आपण त्यावर मात करण्यासाठी विशिष्ठ तर्‍हेचे डावपेच आखणे, मनोबल वाढविणे, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अथवा तज्ज्ञांकडून नवे-नवे प्रयोग करणे आज या सार्‍या गोष्टींची अत्यंत आवश्यकता व गरज आहे. पण आमची राज्य कबड्डी संघटना एकदम मठ्ठ आहे असेच म्हणावे लागेल. आज खो खो खेळात गेली अनेक वर्षे महाराष्ट्राला यश मिळत आहे ते याचमुळे.

विविध राष्ट्रांतील आणि राज्यांतील संघांचे, खेळाडूंचे विविध स्तरांवरील स्पर्धातील त्यांच्या स्पर्धात्मक खेळांचा, त्यांच्या गुणवत्तेचा आणि मानसिकतेच्या वृत्तीचा अभ्यास करण्याची गरज आहे. विरुद्ध संघांवर मानसिक दबाव आणणे, खेळाडूंची मने कमकुवत करून त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत तर करावीच. परंतु त्वरित निर्णय घेण्याची क्षमता चुकीची पाऊले उचलण्यास भाग पाडू शकेल अशी क्षमता आपल्या संघाच्या मार्गदर्शकाकडून आणि व्यवस्थापकांच्या सहाय्याने भूमिका पार पाडता आल्या पाहिजेत. असं करण्याची कुवत ज्या संघांमध्ये ऊर्जा निर्माण करत असते तेव्हाच त्यांच्या संघाला विजयाची प्रेरणा निर्माण करत असते!

आज राज्य कबड्डी असो.चे सरचिटणीस म्हणतात,‘आमच्याकडून चुका झाल्यात त्या आम्ही सुधारण्याचे प्रयत्न करू. अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजीही घेऊ!’ मुळातच पहिली चूक राज्याच्या कबड्डी संघाचे घाईघाईने व्यवस्थापनामध्ये कमतरता ठेऊन आठ-दहा दिवसांचे शिबीर उरकून फार मोठी आवश्यक असलेली गुणवत्ता वाढू शकणार नाही. निवड झालेले खेळाडू गुणवान असावेत. यांच्यात कमी गुणवत्तेचे खेळाडू निवडून त्यांना कायम राखीव म्हणून बाहेर बसवणे हे संघाचे मनोधैर्य खर्ची करत असते.

मार्गदर्शकांचा विविध स्तरांवरील स्पर्धांत प्रत्यक्ष जाऊन अन्य कबड्डी संघांचे गुण-दोष हेरणे, खेळाडूंची आणि संघांची मानसिकता व मनोधैर्य याबाबत माहिती करून घेणे. आपल्या संघाचे या माहितीद्वारा नितीधैर्य वाढविणे व त्यानुसार चाली करणे. योग्य वेळी विशिष्ट खेळाडूसाठी डावपेच आखणे. या संदर्भात सर्व खेळाडूंशी विचार-विनिमय करून संघाचं मनोबल वाढेल याची दक्षता घेणे आदीची सारी जबाबदारी प्रशिक्षक व तज्ज्ञांनी घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षक किती राष्ट्रीय स्पर्धेत किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला यापेक्षा येथे ही सारी जबाबदारी स्वीकारुन संघ विजयी करणे हीच जिगर व जिद्द मार्गदर्शकाकडे हवी.

तरच संघाच्या भविष्याचा वेध घेण्याची आपली प्रवृत्ती वाढीस लागू शकेल तेव्हाच आपला संघ मातब्बर संघांवर मात करू शकेल! स्पर्धांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक यांचे अहवाल वाचून व त्याच्यावर विचारविनिमय करून काहीच होणारे नाही. निवड समित्या आणि त्यांची कार्यपद्धत पारदर्शक दिसत नाही. स्पर्धेतील सांख्यिकी माहितीच्या आधारे व प्रत्यक्ष खेळाडूंची गुणवत्ता या सार्‍याचा खेळाडू निवडीसाठी वापर करून गुणी खेळाडूंना न्याय द्यावा. यासाठी या खेळाडूंचे शिबीर मात्र 30 ते 35 दिवसांचे असावे. परंतु फेडरेशनच्या स्पर्धा कार्यक्रमामुळे काही वेळा ते शक्य होणारे नाही. यासाठी संभाव्य खेळाडूंची शिबिरे घेतल्यास भविष्यात याचा नक्कीच लाभ होईल!

पूर्वी विजयश्री मिळत होती; पण आता मात्र चित्र बदलले आहे. अन्य राज्यांनी देखील आपली या खेळातील कौशल्ये, गुणवत्ता व मनोबल वाढविलेलं आहे. आता कबड्डीचा खेळ इतर राज्यांतून गुणवत्तेने विकास होताना दिसत आहे. आपल्या कार्यकर्त्यामध्ये भविष्याचा वेध घेऊन शोधक अभ्यासूवृत्तीचा अभाव आहे. आज ना उद्या केंद्र सरकारची आचारसंहिता ही पाळावीच लागणार आहे. फेडरेशनमध्ये याचा परिणाम दिसू लागलेला आहे; पण आमचं राज्य आणि त्याला संलग्न असणारे सारे जिल्हे चिडीचूप आहेत. हा बदल काळानुसार न केल्यास कबड्डी खेळाचं खच्चीकरण झालेलं दिसेल!

पराभवाचं खापर कुणावर तरी मारून पदाधिकारी पुन्हा त्याच कार्यपद्धतीने मोठ्या तोर्‍यात ब्लेझर घालून मंचकावर व विविध चॅनेलवर वावरताना दिसतील. राज्य कबड्डी असो.च्या कार्यकर्त्यांना ना याची खंत ना याचा खेद वाटत आहे. वरिष्ठ संघटनेच्या पदांवर, समित्यांवर जाण्यासाठी ‘अब मेरा नंबर कब आयेगा?’ याच्या प्रतिक्षेत वाट पाहत आहेत.

-मनोहर आ. साळवी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -