घरमुंबईवसईला पावसाने झोडपले

वसईला पावसाने झोडपले

Subscribe

---विरार, नालासोपाराही जलमय

मंगळवारी संध्याकाळपासून कोसळत असलेल्या पावसाने वसई- विरार परिसराला झोडपून काढले. शहरी आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणे जलमय झाली होती. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. नालासोपारा आणि वसई दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. निम्म्या वसईची वीज सकाळी दहा वाजताच गायब झाली होती. तर भोयदापाडा आणि नायगाव येथे पाण्यात अडकलेल्यांना सुखरुपस्थळी हलवावे लागले.

गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर जोरदार हजेरी लावली. गेल्या छत्तीस तासात वसई- विरार परिसरात 500 मीमीहून अधिक पाऊस कोसळला. परिणामी मंगळवारी रात्रीपासून वसई जलमय झाली होती. याचा फटका काल रात्री दीड दिवसाच्या बाप्पांना बसला.

- Advertisement -

नालासोपारा-वसई दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा काही काळ ठप्प झाली होती. परिणामी पश्चिम रेल्वेची सेवा कोलमडून पडली होती. सकाळी नऊनंतर लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. तर दहा ते अकराच्या दरम्यान लोकल गाड्या विरार ते वसई दरम्यान बंद पडल्या होत्या. त्यामुळे लोकल सेवा चर्चगेट ते वसई दरम्यान सुुरु होती. तसेच विरार ते डहाणू दरम्यानच्या लोकल सेवेवरही त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे सकाळी कामावर जाणार्‍या हजारो प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांनी घरी परतावे लागले होते. संध्याकाळपर्यंत लोकलसेवा विस्कळीतच झाली होती.

वीज पुरवठा बंद
सबस्टेशनमधील पाण्याची पातळी वाढल्याने वसई, नालासोपारा आणि विरार परिसरात बारा वाजल्यापासून वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. महावितरणने दीड लाख ग्राहक बाधित झाल्याचे कळवले असले तरी प्रत्यक्षात विरार आणि नालासोपारा परिसरातील वीज पुरवठा सकाळी दहा वाजल्यापासूनच खंडीत झाला होता. संध्याकाळी उशिरापर्यंत वीज पुरवठा पूर्ववत झाला नव्हता. भोयदापाडा येथे पाण्यात अडकलेल्या 70 लोकांना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सुरक्षित स्थळी हलवले. तसेच नायगाव येथे अडकलेल्या 12 कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -