घरमुंबईउत्सूकता शिगेला

उत्सूकता शिगेला

Subscribe

आता चंद्रावरील कुतुहलाचा होणार उलगडा

‘चांद्रयान-1’च्या मोहीमेतून चंद्राच्या कक्षेत जाण्याची अवघड मोहीम पार पाडल्यानंतर भारताचे ‘चांद्रयान-2’चे विक्रम लँडर शुक्रवारी मध्यरात्री 1.30 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. आजपर्यंतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा कोणत्याच देशाने प्रयत्न केला नसून, भारताने चांद्रयान-2 मधून ही अवघड मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. त्यामुळे इस्रोच्या कामगिरीकडे देशवासियांसह सार्‍या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. भारताची ही कामगिरी यशस्वी व्हावी यासाठी सार्‍या भारतीयांनी शुक्रवारपासून देव पाण्यात ठेवले होते. तसेच सध्या देशात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीयांनी गणरायाला चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी साकडे घातले.

भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चांद्रयान-२ मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी जसजसा जवळ येत होता, तशी सर्व भारतीयांची उत्सूकता शिगेला पोहोचली होती. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरणार असल्याने त्याचे लाईव्ह दृश्य पाहण्यासाठी खगोलप्रेमीसह सर्व भारतीय शुक्रवारी रात्रीपासून टीव्हीसमोर बसले होते. इस्रोकडून येणारी प्रत्येक माहिती भारतीय उत्सुकतेने पाहत होता. इस्त्रोने लँडिंगचे काऊंटडाऊन सुरू केल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या हृदयाची धडधड अधिक वाढली.

- Advertisement -

२२ जुलैला श्रीहरीकोटा केंद्रावरून चांद्रयान २ ने आवकाशात झेप घेतली. तेव्हापासून आजपर्यंत चांद्रयानाने अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत आता चंद्राच्या सर्वात जवळच्या कक्षेत प्रवेश केला आहे. दीड महिन्यांपासून श्रीहरीकोटा इथल्या डीप स्पेस सेंटरमध्ये चांद्रयान २ च्या संपूर्ण प्रवासाचे नियंत्रण केले जात आहे. प्रतितास २१ हजार ६०० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने चांद्रयान २ चंद्राच्या दिशेने झेपावले होते. या प्रवासात आत्तापर्यंच चांद्रयानाने २१ लाख ८४ हजार किलोमीटरचे अंतर पार केले आहे. आता शेवटच्या काही किलोमीटरचा प्रवास शिल्लक असून मध्यरात्रीनंतर चांद्रयान २ चा विक्रम लँडर प्रग्यान रोव्हरसोबत चंद्रावर उतरेल. या प्रक्रियेमधला सगळ्यात आव्हानात्मक भाग हा रोव्हर चंद्रावर उतरल्यानंतरचा असणार आहे. १५ मिनिटांचा हा काळ भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी आव्हानात्मक असेल. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना विक्रम लँडरचे कुठलेही नुकसान होणार नाही ही काळजी शास्त्रज्ञांना घ्यायची आहे. विक्रम लँडरच्या आतमध्ये प्रग्यान रोव्हर आहे. हा रोव्हर चंद्रावर शोधकार्याचे काम करणार आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डी.के.सिवन यांनी दिली.

चांद्रयान १च्या यशानंतर ११ वर्षांनी चांद्रयान २
चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी याआधी भारताने २००८ साली चांद्रयान १ चंद्राच्या कक्षेत नेले होते. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून ते लाँच केले होते. यावेळी १० महिने आणि ६ दिवसांचा प्रवास करून ते चंद्राच्या कक्षेत गेले होते. चांद्रयान १ ने चंद्राच्या विविध कक्षांमध्ये भ्रमण करून महत्वाची माहिती मिळवली होती. आता चांद्रयान २ थेट चंद्रावर उतरून तिथल्या भूभागाचा अभ्यास करणार आहे.

- Advertisement -

भारतीय अवकाश वैज्ञानिकांची ताकत जग पाहील – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे. 130 कोटी भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तो लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. संपूर्ण जग आमच्या अवकाश संशोधकांचे कौशल्य आणि ताकत पाहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘इस्रो’कडून महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेची तयारी
चांद्रयान -२ मोहीम अखेरच्या टप्प्यात असताना इस्रोची ‘गगनयान’ मोहिमेची तयारी सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत देशाचे अंतराळवीर इस्रो स्वबळावर अवकाशात पाठवणार आहे. २०२२ पर्यंत तीन भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी इस्रोची तयारी विविध पातळीवर सुरू आहे. यामध्ये अंतराळवीर निवडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. भारतीय वायू दलाच्या टेस्ट पायलटची अंतराळवीर म्हणून प्राथमिक निवड करण्यात आली आहे. नुकत्याच या टेस्ट पायलटच्या प्राथमिक वैद्यकीय तपासण्या या इन्स्टिट्यूट ऑफ ऐरोस्पेस मेडिसिन या संस्थेने पूर्ण केल्या आहेत.

चांद्रयान-2 विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिग केल्यास अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरेल. या आधी रशिया, अमेरिका आणि चीनने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चंद्रावर अलगद उतरणे हा रोमांचकारी अनुभव असेल. इस्रोने असा अनुभव यापूर्वी कधीच घेतलेला नाही. चांद्रयान-1 मोहिमेच्या वेळी चंद्राच्या कक्षेत जाणेच शक्य झाले होते
– डी. के. सिवन, चेअरमन, इस्त्रो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -