घरक्रीडाहळुहळू धावणारी भारतीय एक्स्प्रेस!

हळुहळू धावणारी भारतीय एक्स्प्रेस!

Subscribe

भारतात सध्या उत्सवाचे दिवस जोरात सुरू आहेत. उत्सवाच्या जोशात रमणार्‍या भाबड्या भारतीय मनाला नाट्यमय कहाण्यांचं पारंपरिक आकर्षण आहे. त्यामुळे अ‍ॅथलेटिक्सच्या क्षेत्रातसुद्धा नाट्यमय कहाण्यांचं भरघोस पीक आलं आणि ते फोफावलं तर त्यात नवल ते काय? खरेपणा न पडताळता, एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची इच्छा नसल्याने, छोट्या कहाण्या अतिरंजित ,अतिशयोक्त होऊन जातात. सावरखेड एक्स्प्रेस, माण एक्स्प्रेस, धिंग एक्स्प्रेस, पायोली एक्स्प्रेस आणि आठवायला गेलं तर अनेक एक्स्प्रेस गाड्यांची नावं डोळ्यापुढं उभी राहतात. वरीलपैकी कुणा अ‍ॅथलिटनं ऑलिम्पिकमध्ये किंवा जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींत पदक मिळवलंय का? तर उत्तर ‘नाही’ असंच येतं. मग तुम्ही म्हणाल वरील सार्‍या अ‍ॅथलिट्सच्या नावापाठी एक्स्प्रेस गाड्यांची नाव कशी जोडली गेली? भारतीय मानसिकतेत त्या प्रश्नाचं उत्तर सापडतं. खरं तर तेथूनच अतिशयोक्त गोष्टींचा प्रवास सुरू होतो.

सर्वसामान्य परिस्थितीशी टक्कर देत जेव्हा अ‍ॅथलिट नावारूपाला येतो, तेव्हा सार्‍या गावाला त्या अ‍ॅथलिटचं कौतुक वाटणं स्वाभाविक आहे. सर्वसामान्य क्रीडा रसिकाला अ‍ॅथलिटने उपसलेले कष्ट माहीत असतात. त्यामुळे आशियाई पातळीवर गाजल्यानंतर अ‍ॅथलिट आणि अ‍ॅथलेटिक्सप्रेमी यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. परंतु, जागतिक दर्जा न पाहिलेल्या अ‍ॅथलिटसाठी, सुरुवातीचे काही परदेश दौरेदेखील अनुभवसंपन्न करणारे असतात. मात्र, कौतुकमग्न भारतीय अ‍ॅथलिट, ना परदेशी प्रशिक्षकाच्या वाट्याला जात, ना जागतिक पातळीवरील स्पर्धाशर्यतींत भाग घेत.

- Advertisement -

१९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये केवळ रशियन आणि पूर्व जर्मन अ‍ॅथलिट्स नसल्यामुळेच पी. टी. उषा चौथी तरी येऊ शकली. ही गोष्ट समस्त भारतीयांना म्हणावी तशी उमगलेली नाही. बरं, एकदा अतुलनीय कामगिरीला गवसणी घातली की, पुन्हा त्या कामगिरीच्या जवळपासही आपले अ‍ॅथलिट उभ्या आयुष्यात फिरकत नाहीत. ही वारंवार अनुभवाला येणारी गोष्ट आहे. १९८४ चा उषाचा ४०० मीटर्स हर्डल्समधील विक्रम तिने ना तिच्या हयातीत मोडला, ना अन्य कुणी अ‍ॅथलिटने त्या विक्रमला हात घातला! आजच्या तरुणाईच्या भाषेत बोलायचं तर ‘पायोली एक्स्प्रेसने’ स्पीड कधी पकडलाच नाही!

जी गोष्ट ‘पायोली एक्स्प्रेस’ची, तीच गोष्ट ‘माण एक्स्प्रेस’ची! जशी उषा लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धावली, तशी ललिता बाबरची माण एक्स्प्रेस रिओ ऑलिम्पिकमध्ये अंतिम शर्यतीअगोदरच धावली. बाबरने ३००० मीटर्स स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम केला, पण त्या विक्रमी वेळेपेक्षा मंद वेळ देत बाबर अंतिम फेरीत पाचवी आली. बाबरचा विक्रम तोडला जाणं सोडाच, पण त्यानंतर कायम अति मंद वेळ ३००० मीटर्स स्टीपलचेसमध्ये दिली जावी, याला काय म्हणावं?

- Advertisement -

यावेळच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींत, द्युती चंद १०० मीटर्स धावण्यात प्राथमिक फेरीत सातवी आली. अविनाश साबळे ३००० स्टीपलचेसमध्ये प्राथमिक फेरीत सातवा आला. अन्नू राणी भालाफेकीत अंतिम फेरीत आठवी आली. साबळे आणि अन्नूने राष्ट्रीय विक्रम केला. परंतु, ते जागतिक स्तरावर फार कमी पडले. हंगामातील सर्वोत्तम वेळ देणार्‍या मिश्र रिले संघाच्या अ‍ॅथलिट्सनादेखील अंतिम फेरीत सातव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. चित्रा दुसर्‍या प्राथमिक फेरीत आठवी आणि ३५ स्पर्धकांत ३० वी आली.

दोन वर्षांपूर्वी लंडन येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींत निवड न झाल्याने चित्रा धाय मोकलून रडली! पहिला नंबर येऊनसुद्धा संघात निवड न झाल्याने भारतीय अ‍ॅथलेटिक्स पदाधिकार्‍यांच्या विरोधात कोर्टात गेली. केस करीन म्हणाली. गरीब बिचार्‍या चित्राची कहाणी समाजमाध्यमांवर अतिशय गाजली. मुख्य धावपटूंच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर (२०१७) आणि दोहा (२०१९) येथील आशियाई स्पर्धाशर्यती गाजवत चित्राने पहिला क्रमांक पटकावला. यावेळच्या दोहा येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींत, चित्राची फार बिकट अवस्था झाली. जागतिक दर्जा काय असतो याचा जणू तिने प्रथमच अनुभव घेतला. १५०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत तिने स्वतःची सर्वोत्तम वेळ नोंदवली खरी, पण ती कुणाच्याच नजरेस येण्याच्या योग्यतेची नव्हती!

नेमक्या या गोष्टी समाजमाध्यमांवर फिरत नाहीत. अ‍ॅथलेटिक्सप्रेमींना कळत नाहीत. त्यामुळे कोण लायक आहे आणि कोण लायक नाही, हे सर्वसामान्य अ‍ॅथलेटिक्सरसिकाला कळत नाही. उत्सवात रमणार्‍या भारतीय समाजमनाला सार्‍या खर्‍या गोष्टींचा विसर पडतो आणि अ‍ॅथलेटिक्सप्रेमी भारतीय विक्रम केल्याच्या जल्लोषात बेभान होऊन जातो!!

यावेळच्या भारतीय संघात हिमा दास आणि नीरज चोप्रा यांचा तंदुरुस्त नसल्याने संघात समावेश झाला नव्हता. हिमाला वेळ सुधारण्याचा अजून खूप वाव आहे. परंतु, ८८ मीटर्स अशी सर्वोत्तम कामगिरी असणारा भालाफेकपटू नीरज, आंद्रियास थॉरकिल्डसन (नॉर्वे) याच्या बीजिंग ऑलिम्पिकमधील ९०.५७ मीटर्सच्या ऑलीम्पिक विक्रमापासून, यान झेलेझनी या चेक अ‍ॅथलिटच्या ९२.८० मीटर्सच्या जातीक स्पर्धेतील विक्रमापासून (एडमंटन २००१), तसेच यान झेलेझनीच्याच ९८.४८ या विश्वविक्रमापासून खूप लांब आहे. तो निदान यशाच्या वाटेवर तरी आहे. त्यामुळे अवघ्या ११ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाचा एकमेव दावेदार नीरज या स्पर्धेपर्यंत कशी कामगिरी करतो आणि त्यात किती सुधारणा करतो हे पाहणे रंजक व्हावे. बाकी या एक्स्प्रेस गाड्यांची कहाणी एकदम कठीण आहे. हळुहळू धावणारी भारतीय एक्स्प्रेस, स्टेशन कधी गाठणार?, हाच खरा तर कळीचा मुद्दा आहे!

–उदय ठाकूरदेसाई.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -